Home Cities जळगाव अतिक्रमणाच्या कारवाईत ‘मोठे’ आणि ‘छोटे’ असा भेद नको! मनसेचा महापालिकेला कडक इशारा

अतिक्रमणाच्या कारवाईत ‘मोठे’ आणि ‘छोटे’ असा भेद नको! मनसेचा महापालिकेला कडक इशारा

0
11


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महाबळ परिसरात अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. बड्या अतिक्रमणधारक व्यावसायिकाच्या तक्रारीवरून छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास मज्जाव केला जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मात्र, संबंधित मोठ्या व्यावसायिकाचे रस्त्यावर, फुटपाथवर आणि चौकात अतिक्रमण असल्याचा दावा करत त्याच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. महापालिकेने सात दिवसांत समान कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांनी दिला आहे.

जळगाव शहरातील अतिक्रमणाच्या कारवाईत महापालिका प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. शहरातील महाबळ परिसरात एका बड्या व्यावसायिकाने छोट्या व्यावसायिकांच्या विरोधात महापालिकेकडे तक्रार अर्ज दिला. या तक्रारीचा आधार घेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास मज्जाव केल्याचे मनसेचे म्हणणे आहे. मात्र, तक्रार करणाऱ्या मोठ्या व्यावसायिकाचे स्वतःचे अतिक्रमण रस्त्यावर, फुटपाथवर आणि चौकात असल्याचा दावा करत त्याच्याविरुद्ध कारवाई का होत नाही, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे.

छोट्यांसाठी वेगळा नियम, बड्यांना अभय?

शहरातील अतिक्रमण हटविताना सर्व व्यावसायिकांना समान नियम लागू करणे आवश्यक आहे. मात्र, छोट्या व्यावसायिकांवर कारवाई केली जात असताना बड्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. छोट्या व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होत असताना मोठ्या अतिक्रमणधारकांना व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा दिली जात असेल, तर हा अन्याय असल्याची भूमिका मनसेने मांडली आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वीही महापालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. तसेच, या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय आंदोलनही करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप करत मनसेने नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी शहरातील सर्व अतिक्रमणांबाबत समान भूमिका घ्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

मनसेच्या वतीने संबंधित मोठ्या अतिक्रमणधारकाचे अतिक्रमण तातडीने हटवावे आणि त्यालाही नियमांनुसार व्यवसाय करण्याबाबत निर्बंध लागू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. छोट्या व्यावसायिकांवरील दंडात्मक कारवाई थांबवावी आणि शहरातील सर्व व्यावसायिकांना समान कायदा लागू करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

छोट्या व्यावसायिकांसाठी रस्त्याच्या कडेला पट्टे आखण्याची मागणी

शहरातील छोट्या व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्यांच्यासाठी रस्त्याच्या कडेला निश्चित जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही मनसेने केली आहे. महापालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने पट्टे आखून दिल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही आणि छोट्या व्यावसायिकांनाही आपला व्यवसाय सुरू ठेवता येईल, असे संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे महापालिका प्रशासन आणि छोट्या व्यावसायिक या दोन्ही बाजूंच्या अडचणी सोडविण्यास मदत होईल, अशी भूमिका मनसेने मांडली आहे.

छोट्या व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित करत मनसेने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. “अतिक्रमण काढायचे तर बड्यांचे काढा, छोट्यांना जगू द्या!” असा संदेश देत श्रीकृष्ण मेंगडे यांनी प्रशासनाच्या कथित दुजाभावाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सात दिवसांच्या आत संबंधित अतिक्रमणावर कारवाई न झाल्यास मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या वेळी मनसेचे महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, वाहतूक सेनेचे रज्जाक सय्यद, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, राजेश मराठे आणि समाधान सपकाळे यांच्यासह छोटे व्यावसायिक सुरेश सोनार, सविता सुरवाडे, शारदा सुरडके, अजय भाई, रमेश भाई आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound