औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याप्रती आदर व्यक्त करणारे ट्विट करून ते डिलीट केल्यानंतर आमदार संजय शिरसाठ यांनी यावरून सारवा-सारव केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक आमदार हे मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. यात औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाठ यांनी तर भर मिटींगमध्ये यावरून शिंदे यांच्याशी वाद घातल्याचे वृत्त देखील प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. संजय शिरसाठ, आशिष जैसवाल, प्रताप सरनाईक, चिमणराव पाटील आदींना अपेक्षा असतांनाही मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने ही सर्व मंडळी नाराज असल्याचे अधोरेखीत झाले होते.
या पार्श्वभूमिवर, औरंगाबाद शहरातील शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी एक ट्विट करून ते काही मिनिटांनी डिलीट केले. मात्र तोवर या ट्विटने राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून दिली. या ट्विटमध्ये त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ जोडलेला होता. तसेच यावर महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उध्दवजी ठाकरे साहेब असा उल्लेख केला होता. त्यांनी हे ट्विट नंतर डिलीट केले. मात्र यामुळे खळबळ उडाली.
यानंतर आमदार संजय शिरसाठ यांनी उध्दव ठाकरे हे आमच्यासाठी कुटुंब प्रमुख म्हणूनच होते. त्यांच्याबाबत आमच्या मनात आजही सन्मान असल्याचे सांगितले. तर नंतर पुन्हा याबाबत बोलतांना हे ट्वीट टेक्नीकल प्रॉब्लेममुळे झाल्याचा दावा केला. अर्थात, यातून त्यांनी या प्रकरणी सारवा-सारव करण्याचा पवित्रा घेतल्याचे दिसून आले आहे.