भुसावळ प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार आ. संजय सावकारे यांना विक्रमी मताधिक्य मिळणार असल्याचा आशावाद साकेगाव येथील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. ते लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर, लाईव्ह ट्रेंडस् न्यूजतर्फे विविध गावांमधील मान्यवरांशी संवाद साधला जात आहे. या अनुषंगाने तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असणार्या साकेगाव ग्रामपंचायतीतील पदाधिकार्यांशी संवाद साधला असता त्यांनी आमदार संजय सावकारे यांना येथून मताधिक्य मिळणार असल्याचा दावा केला. याप्रसंगी माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आनंदा ठाकरे म्हणाले की, आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली साकेगाव ग्रामपंचायतीची यशस्वी वाटचाल सुरू आहे. येथे विविध योजनांचे यशस्वी कार्यान्वयन झाले असून विविध विकासकामे मार्गी लागलेली आहेत. त्यांच्याच पुढाकाराने लवकरच मोठे सभागृहदेखील उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तर विद्यमान सरपंच अनिल पुंडलीक पाटील यांनीदेखील आमदार संजय सावकारे यांच्या मदतीने साकेगावात विकासाचे नवीन पर्व सुरू झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, सभागृहाच्या बांधकामासाठी आमदार सावकारे आणि खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रत्येकी २० लाखांचा निधी दिला आहे. याच्या जोडीला साडेबारा कोटी रूपयांची योजना मंजूर करण्यात आली असून डांबरीकरणासह विविध कामांसाठी निधी मिळालेला आहे. दरम्यान, याचमुळे साकेगाव हे आदर्श गाव बनण्याच्या मार्गावर आहे. विरोधक राजकारणासाठी काहीही अफवा पसरवत असले तरी संजय सावकारे यांनी केलेली कामे पाहता त्यांना गावातून तब्बल ७० ते ८० टक्के मतदान होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
पहा : साकेगावचे सरपंच आणि माजी सरपंचांनी व्यक्त केलेले मनोगत.