‘त्या’ बैठकी नंतर अजित पवारांनी घेतली पहाटेची शपथ ! : राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई प्रतिनिधी । २२ नोव्हेंबर २०१९ रोजी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार व मल्लीकार्जुन खर्गे यांच्यातील शाब्दीक वादानंतर अजित पवार यांनी तेथून काढता पाय घेऊन दुसर्‍या दिवशी पहाटे शपथ घेतल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

सामनाचे कार्यकारी संपादक तथा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या आपल्या रोखठोक या स्तंभामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधीच फडणवीस व अजित पवार यांनी भल्या पहाटे घेतलेल्या शपथविधीच्या नाट्यावर भाष्य केले आहे.

यात राऊत यांनी म्हटले आहे की, उध्दव ठाकरे सरकारच्या शपथविधीपूर्वी नेहरू सेंटरमधल्या २२ नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली. तेथे खरगे व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यानंतर श्री. अजित पवार हे बराच काळ त्यांच्या मोबाईल फोनवर खाली मान घालून चॅटिंग करत होते. त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले. अजित पवारांचा फोन त्यानंतर स्विच ऑफ झाला व दुस़र्‍या दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळयात झाले.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, सत्ता स्थापनेच्या काळात शरद पवार व माझ्यात उत्तम संवाद होता व जवळ जवळ रोजच आम्ही भेटत होतो. नक्की कोठे काय सुरू आहे याचे अपडेटस एकमेकांना देत होतो. भारतीय जनता पक्षाशी कोणतेही डील करण्याच्या मनःस्थितीत मला श्री. पवार दिसले नाहीत. याच काळात शेतक़र्‍यांच्या प्रश्‍नांवर पवार मोदींना भेटायला गेले व महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत सांगायचे ते सांगून आले. त्यामुळे पवारांनी भाजपला शब्द दिला होता व त्यानुसार पहाटेच्या हालचाली झाल्या हे खोटेच आहे. मोठे अपघात दुर्दैवाने पहाटे चालक साखरझोपेत असतानाच होतात! असा टोला राऊत यांनी या लेखात मारला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत आजवर चार पुस्तके लिहण्यात आली असली तरी त्यात बर्‍याच काल्पनीक बाबी असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. परिणामी आपण पुस्तक लिहले तर त्यांच्या दाव्यांवर पाणी फेरले जाईल यामुळे असा विचार नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. महाविकास आघाडी स्थापन करतांना आपल्याकडे तोकडी तलवार असल्याचेही त्यांनी या लेखात म्हटले आहे.

Protected Content