भाजपचे विदेश विभाग प्रमुख नेपाळच्या पंतप्रधानांना भेटले

काठमांडू: : वृत्तसंस्था । भाजपाच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी नेपाळच्या पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीत सध्या राजकीय परिस्थितीतीबाबत आणि दोन्ही देशांतील संबंधाबाबत चर्चा झाल्याचे समजते.

चौथाईवाले यांनी सांगितले की, नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि अर्थमंत्री विष्णू पौडेल यांच्या आमंत्रणावरून नेपाळ दौरा केला. नेपाळचे पंतप्रधानांसोबत भेट झाली असल्याचे त्यांनी ट्विटवर म्हटले. त्यांनी या भेटीचा एक फोटोही शेअर केला आहे.

काही महिन्यांपासून नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याकडून सातत्याने भारताविरोधात वक्तव्ये येत होती. त्यानंतर भारताने हालचाली करून नेपाळला आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नेपाळच्या पंतप्रधान ओली यांची भाजप नेत्याने भेट घेतली आहे. या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मागील महिन्यात भारतीय लष्करप्रमुख जनरल एम. एस. नरवणे यांनी नेपाळचा दौरा केला होता.

विजय चौथाईवाले भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्याशिवाय पक्षाच्या परराष्ट्र संबंधाबाबतच्या विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्या देखरेखीतच २०१९ मध्ये अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हाउडी मोदी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात चौथाईवाले यांचा मोठा वाटा होता. विजय चौथाईवाले हे शास्त्रज्ञ असून भाजपात सामिल होण्याआधी ते टोरंट कंपनीसाठी काम करत होते. वर्ष २०१४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला.

या भेटीमध्ये भारत आणि नेपाळमधील संबंधावर आणि नेपाळमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. नेपाळमध्ये सध्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातील गटबाजी वाढली आहे. एक गट ओली यांच्यासोबत असून दुसरा गट पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांच्यासोबत आहे.

याआधी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी देखील नेपाळ दौरा केला होता. नोव्हेंबरमध्ये भारतीय लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणेदेखील आले होते. भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ चे प्रमुख सामंत कुमार गोयल यांनीदेखील ऑक्टोबरमध्ये नेपाळ दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी नेपाळच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केली होती.

Protected Content