प्रकाश आंबेडकरांनी लोकांना वेठीस धरू नये- राऊत

मुंबई । प्रकाश आंबेडकर यांनी केलेली कायदेभंगाची भाषा चुकीची असून त्यांनी लोकांना वेठीस धरू नये असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठी पंढपुरात वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर सहभागी झाले आहेत. त्यांच्या या भूमिकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टिका केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मंदिरांना इतक्या महिन्यानंतरही टाळं लागणं हे काही आनंदाने केलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण सरकार हे टप्प्याटप्याने अनेक गोष्टी सुरु करत आहे. भविष्यात लवकरच मंदिरं, रेल्वे सुरु होण्यासंदर्भात चर्चा होईल. विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगला तर महाराष्ट्राच्या जनतेवर उपकार होतील. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात जी गर्दी जमवली आहे ती रेटारेटी सुरु आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे चित्र सकारात्मक आणि चांगलं नाही. पंढरपुरातील दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्र आसुसला आहे, फक्त जमलेत ते लोक नाहीत. वारकरी संप्रदाय तसंच अनेकांशी आमची चर्चा झाली आहे. मंदिराबाहेर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसतो. हजारो लोक जमले आहेत. त्यातून संक्रमण वाढू शकतं. मुख्यमंत्र्यांनी हा धोका ओळखूनच ही परवानगी दिलेली नाही, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

नेते नियम मोडून आत जाऊ सांगत आहेत. प्रकाश आंबेडकर एक संयमी नेते आहेत. कायद्याचे जाणकार आणि अभ्यासक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते वारसदार आहेत. अशा प्रमुख व्यक्तीकडून कायदेभंगाची भाषा करणं लोकांना हुसकावण्यासारखं आहे. विरोधक आणि मंत्री एकत्रित मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे, असं संजय राऊत बोलले आहेत. लोकांना वेठीस धरु नये. परिस्थती सुधारत असून त्यात तणाव निर्माण होता कामा नये, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

Protected Content