३५०० किलोच्या हेरॉईनमध्ये कितीची तोडपाणी ? : संजय राऊतांचा सवाल

मुंबई प्रतिनिधी | आर्यन खानच्या प्रकरणात २५ कोटींची तोडपाणी होत असेल तर ३५०० किलो हेरॉईनच्या प्रकरणात कितीची तोडपाणी झाली असेल ? असा सवाल आज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित करत भाजपवर टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, कॉर्डेलिया क्रुझवर एक-दोन ग्रॅम अमली पदार्थ सापडले व त्याचा मोठा उत्सव एनसीबीच्या समीर वानखेडे नामक अधिकार्‍याने केला. त्याच दरम्यान गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर ३५०० किलोचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत २५ हजार कोटी इतकी आहे. या बंदराचे मालक उद्योगपती अदानी आहेत. त्यामुळे प्रसिद्धी व कारवाईच्या बाबतीत ३५०० किलो हेरॉईनवर मुंबईच्या क्रुझवरील एक ग्रॅम चरस भारी पडले. हे इथे स्पष्टपणे नमूद केले पाहिजे! ायदेपंडित सांगतात, संपूर्ण प्रकरण व मूळ पुरावे पाहता हे प्रकरण जामीन मिळावा असेच आहे. अशा प्रकरणात फसलेल्या मुलांना योग्य मार्गावर आणा. त्यांना योग्य ती शिक्षा करा. पुनः पुन्हा त्याच चिखलात ढकलू नका, असे आपला कायदा सांगतो, पण तसे घडल्याचे दिसत नाही.

यात पुढे म्हटले आहे की, आता या आर्यन प्रकरणातला धक्कादायक खुलासा झाला आहे. आर्यन खान याच्यावरील कारवाई टाळण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी मध्यस्थांमार्फत झाली. त्यातली मोठी म्हणजे ८ कोटी रुपये इतकी रक्कम अधिकारी समीर वानखेडे यांना मिळणार होती. त्यातली काही रक्कम इकडे तिकडे कशी फिरवण्यात आली हे या संपूर्ण प्रकरणातील एक पंच प्रभाकर याने समोर येऊन सांगितले. या प्रकरणातला एक साक्षीदार किरण गोसावी हा आधीच बेपत्ता झाला आहे. तो बेपत्ता झाला की त्यास बेपत्ता केले, याचा तपास कोणी करायचा? केंद्रीय तपास यंत्रणांचा बुरखाच नव्हे तर संपूर्ण चेहराच या प्रकरणी ओरबाडून निघाला आहे.

प्रश्न शाहरुख खान किंवा त्यांच्या पुत्राचा नसून केंद्रीय तपास यंत्रणांच्या चारित्र्य दर्शनाचा आहे. पैशासाठी व राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी, स्वतःच्या पार्श्वभागाचा कंडू शमविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा असा वारक धिक्कारार्ह आहे. राज्यांच्या स्वातंत्र्यावर, हक्कांवर हे आक्रमण आहे. केंद्रीय तपास यंत्रणा, एनसीबीचे अधिकारी राज्यात येऊन खोटी प्रकरणे करतात, लाचखोरी करतात व त्यांना जाब विचारणार्‍यांना भारतीय जनता पक्षाचे लोक देशद्रोही, असहिष्णू ठरवतात. हा नादानपणा आहे. खोटी प्रकरणे करून काळा पैसा व प्रसिद्धी दोन्ही मिळवायचे असा हा जोडधंदा सुरू झाला आहे.

आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची तोडबाजी तर मग मुंद्रा पोर्टवरील ३५०० किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? हा सवाल लोकांच्या मनात आला असेल तर तुम्ही काय करणार?, असाही सवाल आजच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

Protected Content