जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज ना. गिरीश महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना चक्क शरद पवार व अजित पवार यांचा फोटोंचा वापर केल्यानंतर जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी आज ना. गिरीश महाजन यांना वर्तमानपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. यात त्यांनी चक्क शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो वापरला होता. यासोबत त्यांनी शरद पवार यांचा मोदींसोबत तर अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासोबत फोटो टाकला होता. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
दरम्यान, आजच्या या प्रकाराची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने गंभीर दखल घेतली. दुपारी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एका पत्राच्या माध्यमातून संजय पवार यांना बडतर्फ करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकारची कारवाई करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तर संजय पवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.