जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘माणूस’ केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेली कविता म्हणून संजय हिंगोणेकर यांच्या कवितेकडे पाहावे लागते. ज्याची विचारधारा पक्की आहे तोच अशी कविता लिहू शकतो. व्यवस्थेच्या विरोधात थेट बोलणारी ही कविता ‘राजकीय विधान’ असलेली कविता आहे असे प्रतिपादन लोकशाहीर संभाजी भगत यांनी व्यक्त केले.
प्रागतिक विचारमंच जळगाव यांच्या वतीने मूळजी जेठा महाविद्यालयात कवी संजय हिंगोणेकर यांच्या ‘तूम्ही काहीही म्हणा..!’या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कविता सामान्य माणसाच्या जगण्याभोगण्याचा उद्गार असते. कवीने आजपेक्षा उद्या काय घडणार आहे याविषयी बोलले पाहिजे. आज देशभरात निर्माण झालेली आर्थिक,सांस्कृतिक, राजकीय कोंडी कशी फोडायची? यासाठी आजच्या काळाचे विश्लेषण केले पाहिजे. देशातील एकूण परिस्थिती बदलण्यासाठी सांस्कृतिक राजकारण उभे करावे लागणार आहे असेही ते म्हणाले. आपल्या देशात व्यवस्था तपासायची यंत्रे बिघडल्यामुळे आपल्या विचारधारेचा पराभव झालेला आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आजच्या राजकारण्यांवर केवळ टीका करून प्रश्न सुटणार नाहीत. आपल्याला सामुहिक नेतृत्त्व उभे करावे लागेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बा, भिमा आणि ‘संविधाना’वरील त्यांचे गाणे सादर केले. कवितासंग्रहावर कवी वीरा राठोड यांनी भाष्य केले. संजय हिंगोणेकर हे समष्टीचे वास्तव सत्यनिष्ठ आणि सम्यकपणे मांडणारे कवी आहेत. आजची परिस्थिती भयावह आहे. लेखकांना लेखण्या बंद कराव्या लागताहेत. अशा काळात जोखीम पत्करून व्यवस्थेला प्रश्न विचारणारी कविता लिहिणे धाडसाचे काम आहे. असे ते म्हणाले.कवीच्या रक्तात शाहू-फुले-आंबेडकर असल्यामुळे ते वेदना-विद्रोह-नकार-विज्ञाननिष्ठा-प्रस्थापना ही पंचसूत्री असलेली कविता लिहू शकले असेही त्यांनी सांगितले. सामाजिक परिवर्तनासाठी लढा दिलेले समाजसुधारक या कवितेचे ‘उर्जाकेंद्र’ आहेत. हा कवी क्रांतीचा झेंडा घेऊन शांतीच्या मुक्कामाला निघालेला कवी आहे. म्हणूनच ही सर्वहारांचे प्रश्न मांडणारी रणांगणात उभी असलेली कविता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.कवी संजय हिंगोणेकर यांनी आपल्या मनोगतात देशात लोकशाही अस्तित्वात येऊन ७५ वर्ष झाली आहेत. मात्र सामान्य माणसाचे जगण्याचे प्रश्नही सुटलेले नाहीत. त्यामुळे अस्वस्थ व्हायला होते. या अस्वस्थतेतून मी कविता लिहितो असे सांगितले. आजही माणसामाणसात संघर्ष होत आहेत. शोषण होते आहे. याबद्दल कोणी लिहायला तयार नाही. म्हणून मी परिवर्तनासाठी कवितेला शस्त्र समजून कविता लिहितो आहे असे ते म्हणाले. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने सन्मानपत्र देऊन कवी संजय हिंगोणेकर यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. देवेंद्र इंगळे होते. संजय हिंगोणेकर यांची कविता त्यांच्या संवेदनशील मनात सभोतालातील प्रश्नांनी निर्माण केलेल्या अस्वस्थतेतून आलेली कविता आहे असे ते म्हणाले. अत्यंत साधी-सरळ भाषा असलेली ही कविता दलित कवितेत महत्त्वाची आहे असेही ते म्हणाले. यावेळी प्रमुख अतिथी माजी खासदार उन्मेष पाटील, प्रसिध्द कवी शशिकांत हिंगोणेकर, मुकुंद सपकाळे, अथर्व प्रकाशनचे संचालक युवराज माळी उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रा. ए.बी. पाटील, प्रा. के.के. वळवी, डॉ. अनिल हिवाळे, डॉ. मिलिंद बागुल, डॉ. रामटेके, डॉ. अनिल हिवाळे, डॉ. साहेब पडलवार, डॉ. राजीव पवार, डॉ. विवेक यावलकर, डॉ. जुगलकिशोर दुबे, डॉ. विलास धनवे, प्रा. लोकेश तायडे, प्रा. भूषण धनगर, डॉ. ज्ञानोबा सोनटक्के, प्रफुल्ल पाटील, हर्षल पाटील, अविनाश तायडे, शहरातील अनेक साहित्यप्रेमी, कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. योगेश महाले यांनी मानले.