रावेरात रंगणार जंगी मुकाबला : ‘वंचित’चे संजय ब्राह्मणे ठरणार ‘किंगमेकर’ !

भुसावळ-इकबाल खान | राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे ख्यातनाम उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने रावेर लोकसभा मतदारसंघात जबरदस्त मुकाबला रंगणार असून यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे हे ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचे चित्र स्पष्टपणे अधोरेखीत झाले आहे.

यंदा रावेर लोकसभा निवडणुकीत अनेकदा मोठे ट्विस्ट येतांना दिसून येताय. भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांच्यावर विश्‍वास ठेवत लागोपाठ तिसर्‍यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक गारद तर झालेच पण याच्या पाठोपाठ त्यांचे सासरे आमदार एकनाथराव खडसे यांची भाजपमधील घरवापसी निश्‍चीत झाल्याने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात खडसे यांचे वर्चस्व प्रस्थापित होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

दुसरीकडे रक्षा खडसे यांच्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीने भुसावळ विधानसभेचे लक्ष्य असणारे सर्वार्थाने प्रबळ असणारे उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांना उमेदवारी देत तगडे आव्हान उभे केले आहे. ब्राह्मणे यांची उमेदवारी ही आश्‍चर्यकारक असली तरी रावेर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेल्या बौध्द मतांसह अन्य बहुजन समाजांचे सोशल इंजिनिअरिंगचे गणीत यातून मांडण्यात आले आहे.

तर, हे सर्व होत असतांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात मात्र तिकिटावरून मोठा कुटाणा झाला. भुसावळचे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी उमेदवारीसाठी तगडा दावा दाखल केला. त्यांच्या समर्थकांनी भुसावळात जबरदस्त शक्ती प्रदर्शन करून त्यांना बळ देखील दिले. तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी देखील उमेदवारीचा दावा दाखल केला. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना देखील पक्षातर्फे संपर्क करण्यात आल्याची माहिती समोर आली. तथापि, हे समीकरण पुढे सरकले नसतांनाच रावेरचे ख्यातनाम उद्योजक श्रीराम दयाराम पाटील यांचे नाव समोर आले. खर तर ते आधीच भाजपमध्ये दाखल झाले असले तरी त्यांना रावेर लोकसभेची नामी संधी मिळणार असल्याचे पाहून त्यांनी सोमवारी रात्रीच पक्षाचा त्याग केला असून त्यांना आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघ हा गेल्या तीन दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला मानला जात असला तरी येथे दलीत व अल्पसंख्यांकाची मते देखील मोठ्या प्रमाणात आहेत. याच्या जोडीला संख्येने सर्वाधीक असणार्‍या मराठा समाजातील मातब्बर उमेदवार येथून उतरल्यास तो तगडे आव्हान उभे करू शकतो हे गणीत शरद पवार यांनी हेरले. यातूनच त्यांनी श्रीराम दयाराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असल्याने रावेर लोकसभा मतदारसंघात जंगी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांच्या जोडीला भाजपची संपूर्ण ताकद असून आता नाथाभाऊंची देखील घरवापसी होत असल्याचा त्यांना लाभ होणार आहे. तथापि, पक्षातील अंतर्गत विरोधक हे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला छुपी मदत करण्याचा धोका आहे. याच्या सोबतीला मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील अद्याप आपले पत्ते उघड केले नाहीत. यामुळे रक्षाताई खडसे यांच्या समोर अनेक आव्हाने उभे राहतील असे मानले जात आहे. दुसरीकडे श्रीराम पाटील यांची आर्थिक शक्ती मोठी असून याच्या जोडीला मराठा व मुस्लीम समुदायाची एकगठ्ठा मते मिळवून अन्य लहानमोठ्या समुदायांना कनेक्ट करण्याची खेळी केल्यास ते मोठे आव्हान उभे करू शकतात.

या सर्व जोरदार राजकीय लढाईत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांची भूमिका लक्षणीय राहणार असल्याचे दिसून येत आहे. मतदारसंघातील आंबेडकरी समाजासह अन्य बहुजनवादी तसेच सेक्युलर मते मिळवून ते आगेकूच करतील. यामुळे या लढाईत त्यांना मिळालेली मते हे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या राजकीय वातावरणात रक्षाताई खडसे व श्रीराम पाटील यांच्या लढाईत संजय ब्राह्मणे हे ‘किंगमेकर’ची भूमिका बजावण्याचे संकेत दिसून येत आहेत. यात कोण बाजी मारणार ? हे तर निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. अर्थात, रावेरात यंदा जबरदस्त चुरशीचा सामना आपल्याला पहायला मिळणार हे मात्र कुणाला नाकारता येणार नाही.

Protected Content