इंदूर मराठी साहित्य व कला महोत्सवात कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रा.वा.ना.आंधळे

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | २७ वा पद्मभूषण तात्यासाहेब सरवटे आणि राजकवी गोविंदराव झोकरकर स्मृती तीन दिवसीय मराठी साहित्य आणि कला महोत्सव इंदूर (इंदौर) शहरात दि. १३,१४ आणि १५ एप्रिल रोजी संपन्न होत असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी तथा वक्ते प्रा.वा.ना.आंधळे यांची उपस्थिती प्रमुख मान्यवर व कवीसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून लाभणार आहे.

मराठी भाषा संरक्षण समितीच्या विद्यमाने सदरचा महोत्सव प्रीतमलाल दुवा सभागृह कलादालनात होणार आहे. सुप्रसिद्ध चित्रकार स्व.एम.जी.किरकिरे यांच्या स्मरणार्थ १३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता माळव्यातील मराठी कलावंताच्या निवडक कलाकृतीयुक्त तीन दिवसीय चित्र, मूर्ती व छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न होत असून त्यामध्ये सुमारे पन्नास कलाकारांच्या निवडक उत्कृष्ट कलाकृती प्रदर्शित केल्या जाणार आहेत.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन ग्वाल्हेरचे कलामर्मज्ञ प्रमोद जोशी यांच्या शुभहस्ते होणार आहे. विशेष अतिथी शिक्षणतज्ञ पराग खेर असतील. यावेळी वयाची ७५ वर्षे ओलांडलेले सुप्रसिद्ध छायाचित्रकार चंद्रकांत पुणतांबेकर, पद्माकर गाडे तसेच जेष्ठ चित्रकार शंकर शिंदे, तरुण छायाचित्रकार दिलीप भालेराव या महानुभावांना गौरविण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता सभागृहात तीस मराठी लेखक-कवींचा मागील वर्षातील पुस्तक प्रकाशनासह साहित्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी तथा ओजस्वी वक्ते प्रा.वा.ना.आंधळे (जळगाव) तसेच विशेष अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार, लेखक अजय बोकील (भोपाळ), व्यंगचित्रकार यशवंत गोरे (भोपाळ), डॉ.रवि गिऱ्हे (नागपूर), शरद भोकरदनकर (मुंबई) उपस्थित राहणार आहेत.

१४ एप्रिल रोजी सकाळी ०९:३० वाजता कवी प्रा.आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रदेशातील नामवंत कवींचे कविसंमेलन संपन्न होत आहे. याच दिवशी सायंकाळी होणारा जेष्ठ चित्रकर्मींचा प्रात्यक्षित कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे असे महोत्सवाचे आयोजक तथा मराठी भाषा संरक्षण समिती इंदूरचे समन्वयक अनिलकुमार धडवईवाले यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content