साने गुरुजी फाउंडेशनला जिल्हा युवा संस्था पुरस्कार प्रदान

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर या संस्थेला जिल्हा युवा संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जलसंधारण, पर्यावरण, कृषी, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास आणि युवक यांसारख्या सामाजिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र स्वीकारले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आणि क्रीडा अधिकारी सुरेश सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या गौरव सोहळ्याला साने गुरुजी फाउंडेशनचे संदीप धाकड, सचिन मोरे, कल्पना वाणी, उषा कोळी, सुनीता पाटील आणि वंदना पवार यांसारखे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. संस्थेने सामाजिक क्षेत्रात केलेल्या व्यापक आणि महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला, ज्यामुळे संस्थेच्या कार्याला अधिक प्रोत्साहन मिळेल. साने गुरुजी फाउंडेशनला जिल्हा युवा संस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Protected Content