चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक शिवारात शुक्रवारी २ मे रोजी दुपारी ४ वाजता एका शेतात आंब्याच्या झाडाखाली लपवून ठेवलेले तब्बल १२ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे बोगस कापसाचे बियाणे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दहा दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई असल्यामुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे. जीवनलाल चौधरी असे या शेतकऱ्याचे नाव असून, याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृषी विभागाला तावसे बुद्रुक शिवारात मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार कृषी विभागाने तातडीने कारवाई करत जीवनलाल चौधरी यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली झाकून ठेवलेला १२ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा बोगस कापसाचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
चोपड्यात बोगस बियाण्यांचे रॅकेट सक्रिय
या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही चोपडा तालुक्यात बोगस बियाणे जप्त करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत आणि नामांकित कृषी केंद्रातूनच परवाना आणि पक्क्या बिलासह बियाणे खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अज्ञात व्यक्तींकडून किंवा घरोघरी फिरून बियाणे खरेदी करू नये, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. चोपडा ग्रामीण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून, बोगस बियाणे पुरवणाऱ्या टोळीचा शोध घेत आहेत.