पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील वाळू लिलाव पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
नारायणगाव येथील कृषि प्रदर्शन उदघाटनाच्याा कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील वाळूचे लिलाव कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, मी राज्यातील नद्यांमधून वाळू उपसा पूर्णपणे बंद करणार आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या बेसुमार वाळू उपश्यामुळे काही मुठभर लोक धनदांडगे झाले आहेत. परंतु नद्यांचे पाणी आणि प्रवाह धोक्यात आले नदी किनारे व शेतकरी उध्वस्त झाले आहेत. वाळू लिलाव बंद करून या संदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान या सोबतच खाणकाम आणि क्रशरचे देखील धोरण आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील वाळू लिलाव हे अनेकदा वादाच्या भोवर्यात सापडत असून यातून अनेक ठिकाणी गुन्हे देखील घडत असतात. या पार्श्वभूमिवर, राज्याचे उत्खनन धोरण लवकरच येणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू आहे. मात्र यात पुढे काहीही होत नसतांना आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात घोषणा केल्यामुळे आता लवकरच वाळू धोरण अंमलात येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.