मुक्ताईनगरचा समर्थ वंजारी ‘बाल वैज्ञानिक’ पुरस्काराने सन्मानित

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीच्या वाटचालीत मोलाची भर टाकणारी अभिमानास्पद घटना समोर आली आहे. श्री समर्थ सायन्स क्लासेस व निळे कोचिंग अकॅडमीचे विद्यार्थी समर्थ शिवाजीराव वंजारी याने होमीभाभा फाउंडेशन, मुंबई व भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक पटकावून ‘बाल वैज्ञानिक’ पुरस्कार प्राप्त केला आहे.

समर्थ वंजारी दि. २२ एप्रिल रोजी ISROच्या श्रीहरीकोटा येथील मुख्य केंद्रावर पोहोचला असून, त्यास उपग्रह संशोधन, अंतराळ उड्डाण, अवकाश विज्ञान या सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष अनुभव व मार्गदर्शन मिळणार आहे. महाराष्ट्रातून निवड झालेल्या २० गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुक्ताईनगरचा प्रतिनिधी म्हणून समर्थची निवड झाली आहे.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून तब्बल १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यात समर्थने सातवीतून तृतीय क्रमांक मिळवून आपल्या जिल्ह्याचा गौरव केला.

समर्थचे वडील शिवाजीराव भागवत वंजारी हे जेई स्कूलचे शिक्षक असून, मार्गदर्शनाचे धडे समर्थला घरातूनच लाभले. त्याच्या शिक्षणात श्री. मंगेश निळे सरांचे योगदान अतिशय उल्लेखनीय राहिले आहे. पद्मभूषण प्रा. पी.बी. जोशी सर यांच्या हस्ते मुंबईत आयोजित सोहळ्यात समर्थला हा सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास होमीभाभा संशोधन केंद्राचे अनेक शास्त्रज्ञ व अधिकारी उपस्थित होते.

श्रीहरीकोटामधील ISRO भेटीच्या दरम्यान, समर्थला उपग्रह, रॉकेट लाँचिंग प्रक्रिया, स्पेस मिशन आणि शास्त्रज्ञांशी थेट संवादाची संधी मिळणार आहे.

समर्थची निवड ही मुक्ताईनगरच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणसंस्थांचा पुरावा ठरली आहे. श्री समर्थ सायन्स क्लासेस आणि निळे कोचिंग अकॅडमी यांची गुणवत्ता यामुळे अधोरेखित झाली आहे.

आमदार एकनाथराव खडसे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, एज्युकेशन सोसायटीच्या रोहिणीताई खडसे-खेवलकर व इतर मान्यवरांनी समर्थचे अभिनंदन केले आहे. होमीभाभा फाउंडेशन व ISRO यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचे आणि संशोधन वृत्ती निर्माण करण्याचे कार्य होत आहे.

हे विशेष म्हणजे, समर्थ हे यश फाउंडेशन व स्टेट बोर्ड कोर्स शिकत असताना, म्हणजेच इयत्ता सातवीत असतानाच प्राप्त करू शकला.

मंगेश निळे सर, निळे कोचिंग अकॅडमी, व तालुक्यातील विज्ञान शिक्षक संघटना यांनी समर्थच्या या यशाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

समर्थ वंजारीचे यश केवळ वैयक्तिक नसून, मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक स्तरावर पोहचता येऊ शकते, याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.

Protected Content