तीन दहशतवाद्यांचे स्केच जाहीर : पाकिस्तान कनेक्शनचा संशय

पहलगाम-वृत्तसेवा | जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात मंगळवारी ‘मिनी स्विट्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात किमान २६ लोकांचा मृत्यू झाला असून, त्यात बहुतांश पर्यटकांचा समावेश आहे. मृतांमध्ये दोन विदेशी नागरिक (संयुक्त अरब अमीरात आणि नेपाळमधून) तसेच दोन स्थानिक रहिवासी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या हल्ल्यानंतर केंद्र सरकारमध्ये खळबळ माजली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियातील दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात परत येत दिल्ली विमानतळावरच एनएसए अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत आपत्कालीन बैठक घेतली.

सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ला करणारे सर्व ७ दहशतवादी परदेशी नागरिक होते, यामध्ये पाकिस्तानचा थेट हात असल्याची शक्यता आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांचे स्केच जारी करण्यात आले असून, त्यांच्या ओळखी पटवण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी पाकिस्तानातून सतत संदेश प्राप्त करत होते. हल्ला करताना ४ जणांनी थेट पर्यटकांवर गोळीबार केला, तर उर्वरितांनी सुरक्षा यंत्रणांपासून संरक्षणासाठी इतर भागांमध्ये भूमिका घेतली होती.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी वेंस सध्या भारत दौर्यावर असताना, आणि ट्रेकिंग व पर्यटन हंगाम सुरु असतानाच हा हल्ला झाला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा गोळीबार झाला आणि काही क्षणांतच परिसरात गोंधळ उडाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक्स’ (पूर्वीचा ट्विटर) या प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यांनी म्हटले – “जे लोक या अमानवीय हल्ल्यामागे आहेत, त्यांना न्यायासमोर आणले जाईल. त्यांना क्षमा केली जाणार नाही. त्यांचे नापाक हेतू कधीही यशस्वी होणार नाहीत. दहशतवादाविरोधातील आपला संकल्प अधिक बळकट होईल.”

हल्ल्यानंतर केंद्र व राज्य सरकार, तसेच लष्कराने मिळून सुरक्षा यंत्रणा अधिक तीव्र केली असून, विशेषतः दक्षिण काश्मीरमध्ये शोधमोहीम तेजीत आहे. एनआईए आणि रॉ या केंद्रीय यंत्रणांना हल्ल्यामागील पद्धत, शस्त्रास्त्रांचा स्रोत आणि पाकिस्तानातून मिळालेल्या संदेशांचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Protected Content