आगामी विधानसभा निवडणूकीत समाजवादी पार्टी ३५ जागा लढविणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये पक्षाचे जेथे उत्तम काम, उत्तम जनाधार, संघटन व प्रभावक्षेत्र आहे अशा किमान ३५ जागा लढवण्यात येतील, असा निर्णय समाजवादी पार्टीच्या मुंबई येथे झालेल्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये एकमताने घेण्यात आलेला आहे.

समाजवादी पार्टीचे सर्व राज्य पदाधिकारी, राज्य कार्यकारीणी सदस्य, जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक मुंबई येथील बॅलार्ड इस्टेट येथील समाजवादी पार्टी मुख्य कार्यालयामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये समाजवादी पक्षाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश मध्ये लोकसभेच्या ३७ जागा जिंकून जे यश मिळवले आणि देशामधील पक्ष लोकसभेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचवला, त्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेश समाजवादी पार्टी यांचे अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये समाजवादी पार्टीने एकही जागा न लढविता संविधान बचाव, तानाशाही हटाव भूमिकेतून राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीस मदत केली, प्रभाव असलेल्या ठिकाणी प्रचंड संख्येने मतदान घडवून आणले आणि महाविकास आघाडीच्या यशामध्ये वाटा उचलला, याबद्दल राज्यातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

आगामी विधानसभा निवडणुका राज्यामध्ये निश्चितपणाने सत्तापालट घडवणाऱ्या ठरतील, असा विश्वास राज्य कार्यकारिणीने एक मताने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे प्रभावक्षेत्र असलेले विधानसभा मतदारसंघांबाबत तपशीलवार चर्चा झाली आणि अशा ३५ विधानसभा मतदारसंघांमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने विधानसभेच्या निवडणुका लढविण्यात याव्यात, असा निर्णय झाला आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार अबु आसिम आझमी यासंदर्भात पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रताप होगाडे होते. बैठकीमध्ये पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, प्रधान महासचिव परवेझ सिद्दिकी, महासचिव डॉ. अब्दुल राऊफ, डॉ. विलास सुरकर, राहुल गायकवाड, श्रीमती साजिदा निहाल अहमद, कल्पना गंगवार, अनिस अहमद इत्यादी प्रमुखांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस रमेश शर्मा, दीपक चिमणकर, लियाकत खान, याकूब पठाण, इत्यादी राज्यातील विविध जिल्ह्यांतील प्रमुखांनी मनोगत व्यक्त केले.

Protected Content