जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय सेनेने पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा प्रतिशोध घेत “ऑपरेशन सिंदूर” या धडक कारवाईद्वारे अतिरेक्यांचा यशस्वी खात्मा केला. या पराक्रमी कारवाईचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशन – जळगाव जिल्हा यांच्या वतीने जाहीर अभिनंदन आणि समर्थन व्यक्त करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित झालेल्या बैठकीत हा विशेष ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी भारतीय सेनेने दाखवलेली ही तत्परता आणि धाडस देशाच्या सुरक्षेचा आत्मविश्वास वाढवणारी आहे, असे मतही या वेळी व्यक्त करण्यात आले.
या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १९९४-२०२२ या कालावधीत ओ.बी.सी. आरक्षणाच्या आधारे घेण्याचे आदेश दिल्याबद्दलही स्वागताचा ठराव मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय सक्षमीकरणाला चालना मिळेल, असे वक्तव्य काही सदस्यांनी यावेळी केले.
बैठकीत ग्रामविकास, निधी वितरण, व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासंदर्भातही विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या चर्चेमध्ये सदस्यांनी आपल्या भागातील अडचणी, विकासकामे व योजनांची अंमलबजावणी यावर मत मांडले.
या बैठकीस प्रभाकर नारायण सोनवणे, रामदास गोंडू पाटील, नरेंद्र गेंदराज पाटील, मधुकरभाऊ काटे, मनोहर गिरधर पाटील, डॉ. कमलाकर पाटील, माधुरी अत्तरदे, प्रतिभा बोरोले, तुकाराम बोरोले, रवींद्र सूर्यकांत पाटील, गोपाल पाटील, नानाभाऊ महाजन, रवींद्र पाटील आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्यांच्या या बैठकीत भारतीय सेनेच्या पराक्रमाचे कौतुक करताना देशभक्तीचा सूर अनुभवायला मिळाला. त्याचबरोबर सामाजिक आरक्षण आणि स्थानिक राजकारणाशी संबंधित निर्णयांवरही ठाम मत मांडले गेले, जे प्रशासनाच्या पुढील दिशा निश्चित करण्यास उपयुक्त ठरेल.