पहूर, ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर – अजिंठा रोडवर विनापरवानगी अवैध बायोडिझेलची विक्री होत असल्याची जोरदार चर्चा पहूर परिसरात सुरू आहेत.
देशात डिझेलच्या किंमतीने उच्चांक गाठला असून आज रोजी शंभर रुपये लिटरच्या वर डिझेलचे भाव झालेले आहे. या उलट बायोडिझेलचे दर लिटर मागे दहा ते पंधरा रुपये किमतीने कमी असल्याने ट्रक चालकांचा बायोडिझेल वापरण्याचा कल वाढलेला आहे. हाच हेतू साध्य करून अवैध बायोडिझेल विकणाऱ्यांना फावले आहेत.
महामार्गावर ठिकठिकाणी अवैध बायोडिझेल विकणाऱ्यांनी आपले धंदे थाटले असल्याचे बोलल्या जात असून जळगाव – औरंगाबाद महामार्गावरील पहूर येथून काही अंतरावर असलेल्या टोल काट्याजवळील खोलीवर अवैध विनापरवानगी बायोडिझेलची विक्री होत असल्याची जोरदार चर्चा पहूर परिसरात सुरू आहेत.
एवढेच नव्हे तर एका रात्रीत या ठिकाणी तीस ते पस्तीस हजार लिटर अवैध बायोडिझेल विक्री होत असल्याचे बोलले जात आहेत. पहूर जवळील तोल काट्याजवळ असलेल्या खोली समोरील ओट्यावर पंप व त्याच्या बाजूला टँकर तर साईटला पाईपलाईन केलेली असल्याचे दिसून येत असून याप्रकरणी संबंधित विभागाने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी अवैध बायोडिझेल विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी छापे टाकून ते उध्वस्त केले आहेत; मात्र पहूर येथील अवैध बायोडिझेल विक्रीला पाठबळ कोणाचे ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.