मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचणारा ‘सैराट’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १०० कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात चर्चेचा विषय ठरला होता. आर्ची आणि परश्याच्या हृदयस्पर्शी प्रेमकथेसह अजय-अतुल यांच्या अविस्मरणीय संगीताने या चित्रपटाने रसिकांच्या मनावर अमीट छाप पाडली होती. झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट २१ मार्च रोजी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळे या संदर्भात म्हणतात, “जेव्हा आम्ही हा चित्रपट बनवला, तेव्हा तो इतका मोठा यशस्वी ठरेल, याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आम्ही फक्त प्रामाणिकपणे काम केले होते आणि प्रेक्षकांनी त्यावर भरभरून प्रेम केले. आता पुन्हा एकदा ‘सैराट’ प्रदर्शित होत असल्याने आम्हाला प्रेक्षकांचा तोच प्रतिसाद मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. झी स्टुडिओजला याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.”
चित्रपटाच्या प्रमुख अभिनेत्री रिंकू राजगुरू, जिच्या ‘आर्ची’ भूमिकेने प्रेक्षकांना वेड लावले होते, ती म्हणते, “सैराट हा केवळ एक चित्रपट नसून माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. याने मला ओळखच नाही तर प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा दिली. आता पुन्हा मोठ्या पडद्यावर ‘सैराट’ पाहण्याची संधी मिळणार, ही खूप आनंदाची बाब आहे.”
प्रमुख अभिनेता आकाश ठोसर, ज्याने ‘परश्या’ची भूमिका साकारली होती, तो आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतो, “सैराट हा माझ्या करिअरमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. या चित्रपटामुळे मला वेगळी ओळख मिळाली. आता पुन्हा प्रेक्षकांसमोर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, याचा आनंद आहे. मला खात्री आहे की प्रेक्षक पुन्हा एकदा त्याला तितक्याच प्रेमाने स्वीकारतील.”
संगीतकार अजय-अतुल यांचे संगीत हा ‘सैराट’च्या यशाचा मोठा भाग आहे. अजय-अतुल याबाबत म्हणतात, “सैराटमधील गाणी प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारली. आजही ही गाणी लोकप्रिय असून, त्यामध्ये असलेली ऊर्जा कायम आहे. चित्रपटाच्या कथानकामुळे संगीत देताना आम्हालाही एक वेगळी ऊर्जा मिळाली. आता हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.”