चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा भोंगऱ्या बाजार उनपदेव (अडावद) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो आदिवासी बांधव, महिला व लहान मुले या भव्य उत्सवात सहभागी झाले. ढोल-ताशांच्या निनादात पारंपरिक आदिवासी नृत्य आणि बाजारातील गजबज यामुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता.
माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते भोंगऱ्या देवाची पूजा
या उत्सवाचा शुभारंभ माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते भोंगऱ्या देव (बोपदेव) यांची पूजा करून करण्यात आला. यावेळी माजी लोकनियुक्त सरपंच भावना पंढरीनाथ माळी, भिलाला, शरभंग पाड्याचे पोलीस पाटील देवासिंग पावरा, गाव डाया गजीराम पावरा, आदिवासी सेवक संजीव शिरसाठ, शेवरे बुद्रुकचे पोलीस पाटील गणदास बारेला, सचिन महाजन, हरीश पाटील आदींसह आदिवासी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्सवात ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्य
भोंगऱ्या बाजारात आदिवासी संस्कृतीचा अनोखा रंग बघायला मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्य सादर करताना आदिवासी बांधव हरवून गेले होते. परंपरागत वेषभूषा आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी समाजाचा सांस्कृतिक उत्सव रंगला.
बाजारातील उत्साह, शेकडो दुकानांची रेलचेल
भोंगऱ्या बाजारात आदिवासी बांधवांनी आपल्या गरजेच्या वस्तूंची खरेदी मोठ्या उत्साहात केली. शेकडो दुकानांमध्ये पारंपरिक वस्त्र, शेतीसाठी लागणारी अवजारे, घरगुती वस्तू आणि खाद्यपदार्थांची रेलचेल दिसून आली. वर्षभरात एकदाच भरवल्या जाणाऱ्या या बाजारामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
आदिवासी परंपरांचा जपणारा उत्सव
भोंगऱ्या बाजार हा फक्त एक व्यापार मेळा नसून, आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरांचा जपणारा सोहळा आहे. या बाजाराच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा यांचे दर्शन घडते. या भव्य उत्सवात सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती.