बामणोद येथील सागर झांबरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

961fc51a ac72 49f3 bd62 0af951196ae3

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील बामणोद येथील रहिवासी व शारदा प्राथमिक विदयालय, सुप्रिम कॉलनी जळगाव येथील उपक्रमशिल योग शिक्षक सागर इच्छाराम झांबरे यांना सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था जळगाव यांचेतर्फे ‘भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार-२०१९’ व हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटी, जळगाव यांच्यावतीने ‘महाराष्ट्र रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार-२०१९’ हे पुरस्कार त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आले आहेत.

सागर झांबरे नेहमी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबवत असतात. विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी योगा व प्राणायाम शिबिर तसेच, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहीत करणे व त्यांच्या विकासासाठी मार्गदर्शन करणे तसेच पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व सीडबँक यासारखे उपक्रम राबवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात.

आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी मार्गदर्शन व व्यसनमुक्तीविषयी नेहमीच जागरुकता निर्माण करत असतात. झांबरे यांना शासनाच्या होणाऱ्या विविध परीक्षांच्या नियोजनाचा व कार्यालयीन कामकाजाचा उत्कृष्ट अनुभव आहे. त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारांबद्दल विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Protected Content