ब्रेकींग : एस. टी. कर्मचार्‍यांच्या संपातून कनिष्ठ वेतनश्रेणी संघटनेने घेतली माघार

मुंबई प्रतिनिधी | गेल्या महिन्याच्या प्रारंभीपासून सुरू असलेला एस. टी. कर्मचार्‍यांचा संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा आज कनिष्ठ वेतनश्रेणी संघटनेचे नेते अजय गुजर यांनी पत्रकार परिषदेत केली. याप्रसंगी परिवहन मंत्री अनिल परब यांची उपस्थिती होती.

एस.टी. कर्मचार्‍यांचा संप आता चिघळला आहे. आज या संदर्भात न्यायालयात सुनावणी झाली. यात राज्य सरकारने आपण विलीनीकरणासाठी समिती नेमल्याची माहिती दिली आहे. एस.टी. च्या कर्मचार्‍यांना राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांप्रमाणेच वेतनवाढ मिळणार आहे. तसेच एकंदरीत पाहता राज्य सरकार हे कर्मचार्‍यांच्या भूमिकेशी अनुकूल असल्याचे कोर्टात सांगण्यात आले.

दरम्यान, आज सायंकाळी कोर्टात सुनावणी झाल्यानंतर एस. टी. कनिष्ठ वेतनश्रेणी संघटनेचे कामगार नेते अजय गुजर यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी अनिल गुजर म्हणाले की, आमची संघटना ही विलीनीकरणासाठी लढा देतच राहणार आहे. आमची देखील हीच मागणी आहे. मात्र, राज्य सरकारने आता कर्मचार्‍यांशी अनुकूल अशी भूमिका घेतली आहे. यामुळे आपली संघटना ही संपातून माघार घेत असल्याची घोषणा अनिल गुजर यांनी केली. २२ डिसेंबरपासून आमच्या संघटनेचे सर्व कर्मचारी कामावर हजर होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

दरम्यान, ऍडव्होकेट सदावर्ते आणि आपल्या संघटनेत कोणताही वाद नसल्याचा दावा देखील अजय गुजर यांनी याप्रसंगी दिला आहे. तर दुसरीकडे आझाद मैदानावरील बर्‍याच आंदोलकांनी आंदोलनातून माघार घेण्यास नकार दिला आहे. यामुळे एस.टी. कर्मचार्‍यांचा संप पूर्णपणे मागे घेण्यात आला नसला तरी संपात मोठी फूट पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content