एस.टी. कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य : आंदोलन मागे

मुंबई प्रतिनिधी | राज्यभरातील एस.टी. कर्मचार्‍यांनी आज बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी संघटनांसोबत बोलणी करून मागण्या मान्य केल्या. यामुळे एस.टी. कर्मचार्‍यांनी आपले आंदोलन अखेर मागे घेतले आहे.

आज सकाळपासून एसटी कर्मचार्‍यांनी बेमुदत उपोषण सुरु केलं होतं.  यामुळे राज्यातील १५० पेक्षा जास्त एसटी महामंडळाच्या आगारातून एकही एसटी बाहेर पडली नव्हती. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या अशा आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे चांगलेच हाल झाले होते. दरम्यान, सायंकाळी मान्यताप्राप्त एसटी कर्मचारी संघटनेबरोबर परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चा केली. यात सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.

एसटी कर्मचार्‍यांनी नव्या वेतन करारानुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढवून द्यावा आणि  वेतन करारातील पगारवाढीची मागणी करण्यात आली होती. यातील दोन मागण्या मान्य केल्या आहेत. तर पगारवाढीवर दिवाळीनंतर चर्चा करण्यात येईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. तेव्हा या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घ्यावे असंही आवाहन परब यांनी केलं.

यानुसार एस.टी. कर्मचार्‍यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

Protected Content