‘पोस्ट कोविड’ रुग्णांनी फटाक्यांपासून लांब राहावे : डॉ. विजय गायकवाड

जळगाव, प्रतिनिधी | आनंदाचा आणि मांगल्याचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. यावर्षी आरोग्यदायी फटाकेमुक्त दीपावली साजरी करावी, असे आवाहन सामाजिक संघटनांनी केले आहे. तसेच, कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी मात्र फटाक्यांपासून लांब राहावे, फटाक्यातील धूर त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतो अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या दीपावली उत्सव २०२१ मार्गदर्शक सूचनेतही नागरिकांनी यावर्षी फटाके फोडण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळी सणामध्ये, आनंदाच्या क्षणावेळी फटाके मोठ्या प्रमाणावर फोडले जातात. मात्र, फटाक्यांमुळे वायू व ध्वनी प्रदूषण होते. फटाके बनविणाऱ्या कारखान्यात बहुतांश लहान मुले काम करतात. त्यामुळे बाल कामगार प्रथेला चालना मिळते. अनेक जीवघेणे अपघात होतात. अनेक जण जखमी होतात. पशु पक्षी देखील जखमी होवून त्यांना त्रास होतो. यंदा कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने गरजू बांधवाना मदत केली पाहिजे, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे यांनी सांगितले.
फटाक्यांऐवजी किल्ले बांधणे, कुटुंबासह सहलीला जाणे, चांगली पुस्तके घेवून ती वाचणे, मैदानी विविध खेळ खेळून शरीर तंदुरुस्त ठेवणे, मुलांना बौद्धिक खेळणी घेऊन देणे, गरीब वस्त्यामध्ये तसेच गरजूंना मिठाई, कपडे, फराळ, पुस्तके वाटणे किवा घरी कोणी आजारी असेल तर त्यासाठी पैसे देणे असे उपक्रम नागरिकांनी राबवावे जेणेकरून सामाजिक बांधिलकी जोपासली जाणार आहे.
फटाकेमुक्त दिवाळी अभियानात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मराठी विज्ञान परिषद, वर्धिष्णू बहुद्देशीय सामाजिक संस्था, जळगावचा राजा नेहरू चौक मित्र मंडळ, जळगाव, राष्ट्रीय हरित सेना, प्रवीण पाटील फाउंडेशन, जनमत प्रतिष्ठान, डॉ. अब्दुल कलाम पुस्तक भिशी उपक्रम, संघर्ष दिव्यांग बहुद्देशीय संस्था, चेतना व्यसनमुक्ती केंद्र, जिंदगी फाउंडेशन आदी संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

“पोस्ट कोविड” रुग्णांची काळजी घेतली पाहिजे
गेल्या दीड वर्षात कोरोना महामारीच्या दोन भीषण लाटा येऊन गेल्या. त्यात जिल्ह्यातील हजारो नागरिक मृत्युमुखी पडले.अनेक जण कोरोना आजारातून बरे झाले. मात्र कोरोनानंतरहि शरीरात या आजाराची अंश असतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोणाला कोरोना होऊन गेला असेल तर त्यांनी त्यांच्या घराजवळ फटाके फोडणे टाळावे. फटाके उडवायचेच असतील तर मोकळ्या मैदानात कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने वाजवावेत. मास्कचा कायम वापर करावा. जेणेकरून फटाक्यातील विषारी धुरापासून दूर राहता येईल. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांच्या शरीरात फटाक्यांचा विषारी धूर गेला तर त्यांच्या छाती, यकृत, फुफ्फुसाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तत्काळ रुग्णालयात तपासणीसाठी आणावे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोविड विभाग इन्चार्ज डॉ. विजय गायकवाड यांनी दिली आहे.

 

Protected Content