यावल प्रतिनिधी । येथील एस. टी. आगारात कार्यरत असलेल्या एका वाहकास एस.टी. बसने प्रवास करणाऱ्या काही तरूणांनी मारहाण केल्याची घटना आज घडली आहे. यासंदर्भात यावल पोलीस स्थानकात त्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, आज (दि.३) सकाळी १० ते १:३० वाजेच्या सुमारास यावल आगारातून नियमित सुटणारी यावल सावखेडा सिम ही एस.टी. (बस क्रमांक एमएच र०, ९०३७) बस प्रवाशी घेवुन सावखेडा सिमहुन सकाळी ११वाजेच्या सुमारास यावलकडे घेवुन येत असतांना दहिगाव विरावली रस्त्यादरम्यान काही विद्यार्थींना एसटी बस वाहक मेहेमुद हमीद तडवी यांनी बसमध्ये प्रवास करीत असलेल्या विद्यार्थीना मागे सरका असे म्हटले. या वक्यावरुन विद्यार्थ्यांना राग आल्याने वाहक आणि त्या तरुणांमध्ये शाब्दीक चकमक झाल्याने तरूणांनी वाहकास बेदम मारहाण केली. याप्रकरणी मेहमुद हमीद तडवी (वय-४१) यांनी यावल पोलिस स्थानकात खबर दिल्याने त्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.