भडगाव प्रतिनिधी । खान्देशातील ग्रामीण भागात विविध प्रकारचे दुर्मिळ लोककला कलाकार सादर करून लोकांचे मनोरंजन केले जाते. या दुर्मिळ लोककलांचा शासकीय पातळीवर विचार व्हायला हवा. तसेच ग्रामीण लोककलांना राज्य मान्यता मिळावी आणि कलाकारांना विविध योजनांमध्ये समाविष्ट करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर मोठा प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन शाहीर शिवाजीराव पाटील यांनी खान्देश विकास लोककला परिषदेच्या माध्यमातून आयोजित लोककलावंत मेळाव्याप्रसंगी केले.
खानदेश लोककला विकास परिषदेच्या वतीने भडगाव येथे पेठ येथिल मारुती मंदिर आवारात खानदेशातील वही गायन कलावंतांचा मेळावा प्रसंगी ते बोलत होते. या मेळाव्याचे उद्घाटन खानदेशातील सुप्रसिद्ध शाहीर व खान्देश लोकरंग फाउंडेशनचे अध्यक्ष शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले याप्रसंगी व्यासपीठावर खान्देश लोककला विकास परिषदेचे अध्यक्ष शाहीर विनोद ढगे, डॉ. रुपेश पाटील, गणेश अमृतकर, प्रकाश वाघ, भडगाव नगरपालिकेचे मुख्यअधिकारी रविंद्र लांडे, शाहीर परशुराम सूर्यवंशी, ईश्वर ततार, बापूराव वाघ, नामदेव पाटील आदी ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.
खानदेशातील वही गायक कलावंत यांना न्याय द्या, शाहीर विनोद ढगे
खानदेशातील वही गायन कला परंपरेबद्दल सर्व उपस्थित कलावंतांना शासन स्तरावर होणाऱ्या विविध योजनांच्या संदर्भात माहिती देऊन कलावंतांमध्ये जनजागृती निर्माण केली. तसेच वृद्ध कलावंत मानधन योजनेच्या संदर्भात माहिती देऊन वही गायन कलावंतांचा लवकरात लवकर खानदेशी स्तरावर भव्य महोत्सव घेणार असल्याचे आवाहन करत खानदेशातील वही गायन ही लोककला प्राचीन काळापासून अस्तित्वात असून या कलेचे शासनस्तरावर कोणतेही महत्त्व अद्याप समजले नसून यासाठी देखील खान्देश विकास लोककला परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत असे शाहीर विनोद ढगे यांनी आपल्या मनोगतुन व्यक्त केले.
डॉ. रुपेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून कलावंतांच्या व कलेच्या संदर्भात विविध मुद्दे उपस्थित करून शासनाने कलाकारांना योग्य तो न्याय देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कोरोना काळात लोककलावंतांची अतिशय दुरवस्था झाली असून यांना योग्य ती मदत शासनाने जाहीर केल्याप्रमाणे लवकरात लवकर द्यावी असे मत व्यासपीठावरील जाणकार मान्यवरांनी व्यक्त केले.
खान्देशातील पाचोरा भडगाव यावल रावेर चोपडा भुसावळ चाळीसगाव इत्यादी तालुक्यातील वही गायन कलावंतांनी आपली लोककला सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर परशुराम सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन शाहीर भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी केले.