खोटेनगर-पाळधी रस्त्यासाठी ३० कोटी मंजूर-पालकमंत्री गुलाबराव पाटील


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा असलेला पाळधी ते तरसोद दरम्यानचा १७.७० किलोमीटर लांबीचा बायपास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (NH-53) येत्या दोन महिन्यांत वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह त्यांनी या बायपासच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.

पाहणीदरम्यान पालकमंत्र्यांनी सांगितले की, खोटेनगर ते पाळधी या रस्त्याच्या विकासासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बायपासचे काम पूर्ण होताच या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल. शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा बायपास महत्त्वाचा ठरणार असून, त्यामुळे शहरातील वाहतूक शहराबाहेर वळवली जाईल.

प्रगतीपथावरील कामे:
बायपास मार्गावर रेल्वे ओव्हरब्रिज, लघुपूल आणि गिरणा नदीवरील मोठ्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे. प्रशासनाने या कामांना विशेष लक्ष देऊन गती वाढवल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या १७.७० किलोमीटरच्या बायपासमध्ये २५ नवीन कल्वर्ट्सपैकी २४ पूर्ण झाले आहेत, तर एक काम प्रगतीपथावर आहे. १० पैकी ९ लघुपूल पूर्ण झाले आहेत. ४ अंडरपासेसचे काम पूर्ण झाले असून, मोठ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन रेल्वे ओव्हरब्रिजपैकी एकाचे काम सुरू झाले असून, दुसऱ्याचे काम लवकरच सुरू होईल.