यावलच्या बालसंस्कार शाळेत आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात आषाढी एकादशीचा पवित्र सण चिमुकल्यांच्या उत्साही सहभागातून भक्तिभावाने साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, ज्ञानोबांच्या गजरात निघालेली दिंडी, आणि भक्तिपूर्ण भजन-आरतीने शाळेचे पटांगण विठ्ठलमय झाले.

विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभावाचे संस्कार रुजवावेत, तसेच आषाढी एकादशी व विठ्ठल-रुक्मिणीच्या महत्त्वाची ओळख लहानपणापासून निर्माण व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बाल संस्कार विद्या मंदिर तसेच बालवाडीत शिकणाऱ्या लहान मुलामुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. “ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली” च्या जयघोषात त्यांनी कृतीगीत व भजन सादर केले. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तीचा गहिवर जाणवू लागला.

कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा करून करण्यात आली. ही पूजा बालवाडीच्या मुख्याध्यापिका शरयू कवडीवाले यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दिंडी काढून विठ्ठल मंदिरात जाऊन हरिपाठ व आरती केली. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या विठ्ठल दर्शन घेत दिंडीचा समारोप केला.

संपूर्ण कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शिक्षक बांधव, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांच्या उत्साही सहभागामुळे कार्यक्रम विशेष यशस्वी झाला. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध, भक्तिपूर्ण आणि संस्कारक्षम वातावरणात करण्यात आले.

ही एकादशी चिमुकल्यांसाठी एक अध्यात्मिक शिक्षणाची संधी ठरली. भावी पिढीत भक्तीपर आणि सांस्कृतिक मूल्यांची बीजे रुजवण्यासाठी अशा उपक्रमांचे मोल अनमोल आहे.