मुंबई, वृत्तसंस्था । ज्येष्ठ साम्यादी नेत्या, माजी खासदार आणि साम्यवादी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या कॉम्रेड रोझा देशपाडे यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात विवाहीत कन्या, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.
रोझा देशपांडे या वृद्धापकाळामुळे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. एप्रिल महिन्यात त्यांच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी झाले होते. शिवाय त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांना दादरच्या सुश्रृषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता.
आजही त्यांची प्रकृती खालावल्याने दुपारी १२.३०च्या सुमारास राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रोझा देशपांडे यांच्या निधनाने साम्यवादी चळवळीचा साक्षीदार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्या सीपीआयच्या तिकिटावर उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक जिंकल्या होत्या. त्या सिद्धहस्त लेखिकाही होत्या. त्यांनी लिहिलेलं ‘एस. ए. डांगे : एक इतिहास’ हे पुस्तक विशेष गाजले