अल कायदाचे ९ दहशतवादी पकडले

 

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । राष्ट्रीय तपास संस्थेने ( एन आय ए ) अल कायदाचे मोठे जाळे उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. एनआयएने केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये अल कायदा मॉड्यूल संबंधी छापे टाकले आहेत. एनआयएच्या या छापा दरम्यान ९ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

अल कायदासंबंधी नव्याने छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. केरळच्या एर्नाकुलम आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे हे छापे टाकण्यात आले आहेत. छाप्यांमध्ये ९ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

एनआयएने छापेमारी दरम्यान केरळमधील एर्नाकुलम येथून ३ आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथून ६ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अनेक संरक्षण संस्था त्यांच्या निशाण्यावर होत्या, असं सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या बहुतेकांचे वय सुमारे २० वर्षे सांगितलं जात आहे. सर्व मजूर आहेत. दहशतवादी कट रचल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात होतं.

पश्चिम बंगाल आणि केरळसह देशातील वेगवेगळ्या ठिकाणी अल-कायदाच्या सदस्यांचे आंतरराज्य मॉड्यूल सक्रिय असल्याची माहिती एनआयएला समजल्यानंतर हे छापे टाकण्यात आले. हा देशातील महत्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करण्याच्या विचार ते होते. एनआयएने यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून एनआयएने डिजिटल उपकरणं, कागदपत्रं, जिहादी साहित्य, धारदार शस्त्रे आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. पाकिस्तान-पुरस्कृत अल कायदाच्या दहशतवाद्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना कट्टरपंथी बनवल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांनी त्यांना दिल्लीसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्यास चिथावण्यात येत होतं.

हल्ल्याच्या उद्देशाने हे मॉड्यूल निधी उभारण्यात सक्रिय होते आणि काही टोळीचे सदस्य शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी दिल्लीकडे जाण्याच्या विचारात होते, असं एनआयएने म्हटलंय.

Protected Content