चित्रा वाघ यांच्यावर रोहिणी खडसेंचा हल्लाबोल ! ( व्हिडीओ )

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेत केलेल्या भाषणावरून रोहिणी खडसे यांनी आज त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला असून यातून या दोन्ही महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.

भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी काल विधानपरिषदेत अतिशय आक्रमक पवित्रा घेतला. विशेष करून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी त्यांना संजय राठोड यांच्या प्रकरणावरून डिवचण्याचा प्रयत्न केला असता वाघ यांनी विधानपरिषदेत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यावरून सोशल मीडियात चर्चा सुरू असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी यावर तिखट भाष्य केले आहे.

आज या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या की, चित्रा वाघ यांचे वक्तव्य बघितल्यानंतर मला बिग बॉस ची जी सिरीयल आहे ना त्या सिरीयलची आठवण झाली. या मध्ये एकमेकांची उणीदुणी काढली जातात आणि त्याच्यात जेवढं एकमेकांच्या बाबतीमध्ये बोललं जाईल तेवढा त्यांचा टीआरपी वाढतो आणि बिग बॉस खुश होतो. म्हणजे कालची वक्तव्य होती ती कुठल्यातरी बिग बॉसला खुश करायसाठी होती का ? असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला. याबाबत त्या पुढे म्हणाल्या की विधानपरिषदेचे सभागृह हे राज्याचं सर्वात श्रेष्ठ सभागृह असून याची एक गरिमा आहे. तिथे सुसंस्कृत भाषा अपेक्षित आहे. आणि त्या सभागृहामध्ये जर अशी भाषा आणि आणि असे वक्तव्य केले जात असतील असे एकमेकांची उणीदुणी काढण्याची ही पद्धत असेल तर त्या सभागृहाच्या गरिमेला कुठेतरी ठेस लागण्याचं काम होत असल्याची टिका त्यांनी केली.

दरम्यान, रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, जिथे विरोधी पक्षातील नेते शेतकरी च्या शेतीमालाला भावासंदर्भात बोलायला जातात महिलांच्या अत्याचारा संदर्भामध्ये बोलायला जातात आणि कापसाला आमचा भाव मिळावा म्हणून नेते बोलायला जातात तेव्हा सभापती महोदय त्यांना तेवढा हवा तेवढा वेळ त्यांना देऊ शकत नाहीत आणि देत दिला जात नाही मग अशा ह्या उणेदुणे काढणाऱ्या लोकांना वेळ तरी कसा दिला जातो ? असा प्रश्न देखील त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला.

खालील व्हिडीओत पहा रोहिणी खडसे यांनी आमदार चित्रा वाघ यांच्यावर केलेली टिका !

Protected Content