धानोरा ता.चोपडा प्रतिनिधी । येथुन जवळच असलेल्या वरगव्हाण गावला जोडणार्या तीनपैकी दोन रस्ते रस्ते खुपच खराब झाले असल्याने येथील गावकर्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
याबाबत वृत्त असे की, वरगव्हाण गावाला जोडणारे तीन रस्ते आहेत, मात्र यातील दोन रस्ते चांगल्या अवस्थेत नाहीत. तब्बल दहा वर्षांपासुन यांची डागडुजी झालेली नाही. यात बिडगाव ते वरगव्हाण-तिन किलामीटर; पंचक ते वरगव्हाण- तीन किलोमीटर तर खर्डी ते वरगव्हाण साडेतीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचा समावेश आहे. यातील खर्डी ते वरणगव्हाण या रस्त्याचे अलीकडेच नूतनीकरण करण्यात आलेले असले तरी अद्यापही दोन रस्ते खराब असल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. रस्ता चांगला नसल्याने येथील लोकांना प्रवास करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे गाव छोटे असल्याने दवाखाना, शेतीसाठी खते,बियाणे,औषधे,बाजार तसेच विविध कारणांसाठी अडावद व धानोरा या बाजाराच्या मोठ्या गावांना वारंवार जावे लागते. मात्र या तिन्ही रस्त्यांवर जागोजागी खोल खड्डे पडले असून साईडपट्टया अतिशय खराब झाल्या आहेत. यामुळे एसटी फक्त शाळेचे मुलांच्या वेळेलाच येते. त्यामुळे खाजगी वाहनांचा वापर करावा लागतो. मात्र रस्त्यापायी तेही वैतागले आहेत. यातच रात्री-अपरात्री तर ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे छोटे-मोठे अपघातही होतात.तर गावात येणारे नातेवाईकही रस्ता मुळे गावाला नाव तर ठेवतातच पण अनेक वेळा येथे येणेही टाळतात.म्हणुन येथील ग्रामस्य व वाहन धारकांचे खराब रस्त्यापायी जगणेच कठीण झाले आहे.
निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधी फक्त मत मागण्यासाठी येथे येत असले तरी हे रस्ते कुणाच्याच खिजगणतीत नसल्याबद्दल वरगव्हाण येतील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. शासनाने याची दखल घेत तिन्ही रस्ते नव्याने करावेत अथवा किमान याची डागडुजी तरी करावी अशी मागणी होत आहे.