न्युझीलंड हल्ल्याचा बदला भारतात हल्ले करून घेण्याचा कट उघड

 

 

 

 

 

pak terrarists

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याचा आयएस आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनांचा कट असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला घडवण्यात येणार आहे. विशेषत: दिल्ली, मुंबई आणि गोव्यातील यहुदी लोकांच्या धर्मस्थळांवर दहशतवादी हल्ले करण्याचा आयएस आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनांचा प्रयत्न आहे.

माहितीनुसार, या हल्ल्यांसाठी दहशतवादी एखाद्या वाहनाचा किंवा चाकूचा वापर करण्याची शक्यता आहे. ही माहिती मिळाल्यानंतर इस्रायली दूतावास, मुंबईतील दूतावास तसेच यहुदी लोकांची धर्मस्थळे, सिनेगॉग्स आणि छाबड हाऊस अशा ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिल्या आहेत. २० मार्च रोजी पहिली माहिती गुप्तहेर यंत्रणांच्या हाती लागली. यात न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
या संभाव्य हल्ल्यांबाबत गुप्तचर यंत्रणांना विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयएस या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता अबु हसन अल-मुहाझीर याची न्यूझीलंडमधील हल्ल्याचा बदला घेण्याचे आवाहन करणारी एक ऑडिओ क्लिप दहशतवाद्यांचे ऑनलाइन ग्रुप आणि विविध चॅट प्लॅटफॉर्मवर वितरित करण्यात आली आहे. या ऑडिओ क्लिपसह दहशतवादी संघटनांच्या समर्थकांनीही असा बदला घेण्याला दुजोरा दिलेले व्हिडिओही दहशतवाद्यांमध्ये फिरत आहेत.
दरम्यान, शहरातील विविध धार्मिक स्थळांभोवतीची सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनांचा यहुदी लोकांची निवासस्थाने आणि त्यांची धार्मिक स्थळे सेनेगॉग्सवर हल्ले करण्याचा प्रयत्न असणार आहे. हा हल्ला करताना जुन्या पद्धतीऐवजी नव्या साधनांचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. या हल्ल्यात चाकू, कार किंवा ट्रकचा वापर केला जाऊ शकतो अशीही माहिती हाती आली आहे. गोव्यातही संभाव्य हल्ले विशिष्ट ठिकाणी केले जाणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. मात्र, माहितीत उल्लेख असलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या ठिकाणांवरही पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. इस्रायल दूतावासाबाहेर पोलिसांनी सुरक्षेत वाढ केल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

Add Comment

Protected Content