यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी काळात होणाऱ्या नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून, शिवसेना (शिंदे गट) यावलमध्ये जोरदारपणे सदस्य नोंदणी अभियान राबवत आहे. या अभियानाला नागरिकांकडून, विशेषतः महिला, तरुण वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांकडून, मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, त्यांच्या आदेशाने आणि शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या अथक प्रयत्नांनी जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागांत विविध ठिकाणी सदस्य नोंदणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. या शिबिरांमधून सर्वसामान्य नागरिकांना शिवसेना पक्षाशी आणि त्यांच्या विचारांशी जोडले जात आहे.
यावल येथे शिवसेना पक्षाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार, यावल तालुकाप्रमुख राजू काठोके, युवा सेना यावल तालुकाप्रमुख अजय तायडे, सेनेचे तालुका संघटक भूषण उर्फ गोलू पाटील, यावल शहर महिला प्रमुख स्वाती पाटील, यावल शहर उपप्रमुख राजू सपकाळे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यावल ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी सदस्य नोंदणी शिबीर घेण्यात आले. या सदस्य नोंदणी अभियानाला सर्वच स्तरांवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आगामी निवडणुकांसाठी शिंदे गट तयारीला लागल्याचे यातून स्पष्ट होत आहे.