यावल, प्रतिनिधी । अनेक दिवसांपासून दुरूस्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या बऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावरील रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी केला असून त्यांनी कामाबद्दल उघड उघड नाराजी व्यक्त करून ठेकेदारांच्या पंटरांना धारेवर धरल्याचा प्रकार समोर आला आहे.
यावल शहरातुन जाणाऱ्या अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर या राज्य मार्गावरील यावल बस स्टॅन्ड परिसरापासुन वन विभाग कार्यालयापर्यंतचा रस्ता हा ठिक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडुन अत्यंत खराब झाला होता. याप्रसंगी या मार्गावर अनेक अपघात देखील घडले असून, या मार्गावरील खराब झालेल्या रसत्याबाबत अनेकांच्या तक्रारी होत्या. तसेच या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील पत्रव्यवहार केला होता. दुरुस्तीचे काम हे भुसावळ येथील एका नाम बडे दर्शन खोटे ठेकेदारास देण्यात आले असून, सदर ठेकेदार हा शासनाच्या निविदा मधील अटीशर्तीच्या अधीन राहुन काम करीत नसल्याने जिल्हा परिषद गटनेते व कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी आज सकाळच्या सुमारास या मार्गाचे काम सुरू असतांना कामास भेट देवुन पाहणी केली. यावेळी संबंधीत ठेकेदाराची माणस हे रस्त्यावर डांबर न टाकता खडीचा सर्रास वापर करून अत्यंत निकृष्ठ प्रतिचे काम करत असल्याची बाब त्यांच्या निर्दशनास आल्याने त्यांनी ठेकेदारांची माणसे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते यांना चांगलेच धारेवर धरले. कामाची गुणवता सुधारण्याचे निर्देश दिलेत. सदरचे काम हे ठेकेदाराच्या वतीने बिओटी तत्वावर सुरू करण्यात आले असून, या रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी ही पाठपुरावा करून कामास तात्काळ करण्यास सांगीतले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी सांगीतले की, आपण या कामाच्या गुणवंत्तेबाबत वरीष्ठ पातळीवर तक्रार करणार आहोत. याप्रसंगी त्यांच्या सोबत इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील, काँग्रेस कमेटीचे यावल शहराध्यक्ष कदीर खान, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह व आदी कार्यकर्ते होते.