पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजित पवार यांना महायुतीत घेतल्याने भाजपची अधिक कोंडी झाली आहे. एक नको असलेले जोखड आपल्या खांद्यावर आल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. जी पुणे येथील एका कार्यक्रमात बाहेर आल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या तोंडावर अजित पवार यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना आमच्या कारणाशिवाय बोकांडी बसवले आहे. त्यांना तातडीने महायुतीतून बाहेर काढा, असे थेट विधान चौधरी यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह महायुतीमध्येही जोरदार खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला, अशी चर्चा अजूनही रंगते. तेव्हापासूनच अजित पवार यांच्याबद्दल भाजपमध्ये कुजबूज सुरु होती. तसेच, त्यांच्याबद्दलही भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजीची भावना होती. असे असले तरी आजवर थेट उघडपणे आणि तेही जाहीर कार्यक्रमात कोणीच बोले नव्हते. मात्र, सुदर्शन चौधरी यांनी मात्र ते धाडस दाखवले. (हेही वाचा, अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची किंमत कमी केली: संघ मुखपत्रातून टीकास्त्र)
प्राप्त माहितीनुसार, एका कार्यक्रमात बोलताना सुदर्शन चौधरी म्हणाले, अजित पवार यांना महायुदीमधून बाहेर काढवे, असे प्रत्येक कार्यकर्त्याचे मत आहे. तुम्ही ही मागणी सल्ला म्हणून घेऊ शकता. अजित पवारांमुळे भाजपच्या पुणे येथील अनेक नेत्यांवर अन्याय झाला आहे. अनेकांना पदं मिळत नाहीत. ते जर महायुतीमध्ये नसते तर सुभाष बापू, राहुल दादांवर, योगेश अण्णांवर अन्याय झाला नसता. ते मागेच मंत्री झाले असते. अनेकांना महामंडळे मिळाली असती. एकदा आमचे आबासाहेब सोनावणे आणि श्याम गावडे अजित पवार यांच्याकडे निधी मागण्यासाठी गेले तर त्यांनी यांनाच थेट प्रश्न केला. म्हणाले तुमचा काय संबंध? आम्ही फक्त 10% निधीच देणार.. आपले सरकार असताना जर आमची परिस्थिती अशी असेल तर आम्हाला नको आहे अशी सत्ता.
पाठिमागच्या 10 वर्षांपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात लढतो आहोत. असे असताना तीच राष्ट्रवादी आमच्या बोकांडी आणून बसवली आहे. कार्यकर्त्यांनी काम करायचे तरी कसे? इथले कार्यकर्ते अक्षरश: भीतीच्या छायेत आहेत. आजवर सोलापूरलाही असाच अनुभव आला आहे. सोलापूर जिल्ह्याला कधीच स्थानिक पालकमंत्री मिळत नाही. नेहमी बाहेरचा पालकमंत्री लादलेला असतो. पुण्यातही तसेच आहे. मुळात अजित पवार यांना घेतलेच कशासाठी, असा थेट सवालही सुदर्शन चौधरी यांनी उपस्थित केला आहे.