भगवान गड-वृत्तसेवा | भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचा संदेश देतांनाच त्यांच्यावर ‘मीडिया ट्रायल’ सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
धनंजय मुंडे यांच्यावर संकट असताना त्यांनी भगवान गड गाठून महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि तिथेच मुक्काम केला. या भेटीनंतर लगेचच महंत नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना ठाम पाठिंबा जाहीर केला.
पत्रकार परिषदेत बोलताना महंत नामदेव शास्त्री म्हणाले, “धनंजय मुंडे यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मात्र, त्यांना हेतुपुरस्सर गुन्हेगार ठरवले जात आहे. मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे संप्रदायाचेही नुकसान होत आहे, असे सांगत त्यांनी संपूर्ण वंजारी समाजाला एकजूट राहण्याचे आवाहन केले.
मध्यंतरी महंत नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर राजकारण करू नका, असे म्हणत पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला विरोध केला होता. त्यामुळे त्यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. परंतु आता त्याच महंतांनी भगवान गडावरूनच धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला आहे.
