वडील आणि बाळासाहेबांचे स्मरण केल्याने अध्यक्षांनी थांबवली हिंगोलीचे खासदार आष्टीकरांची शपथ

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हिंगोली लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची शपथ थांबवण्यात आली. हंगामी लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या शपथेवर आक्षेप घेतला आहे. नागेश पाटील आष्टीकर यांनी संसदेत मराठीत शपथ घेतली. मात्र यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले. त्यावर हंगामी लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेत, दुरुस्ती सुचवली. शपथ घेताना जे लिहिले आहे, त्यानुसारच शपथ घेणं आवश्यक असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे आष्टीकरांना पुन्हा एकदा शपथ घ्यावी लागली.

त्याचे झाले असे की, नागेश पाटील आष्टीकर यांनी शपथेच्या सुरुवातीला म्हटले की, मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने, दत्त महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,व माझे वडील बापूराव पाटील आष्टीकर यांना स्मरुन शपथ घेतो की”, असे म्हंटले. त्यानंतर अध्यक्षांनी त्यांची शपथ थांबवली. आष्टीकर यांनी अशी शपथ घेत असताना, अध्यक्षांनी त्यांना थांबवलं आणि जे लिहिलं आहे तेच वाचायला सांगितले. असे चालणार नाही, जे मराठीत लिहिलं आहे तेच वाचावं लागेल, तशीच शपथ घ्यावी लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर मग नागेश पाटील आष्टीकर यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. यावेळी त्यांनी अन्य नावांचा उल्लेख टाळत जशी लिहिली आहे तशीच शपथ घेतली.

Protected Content