पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सर्वांसाठी घरे या संकल्पनेतून केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ पारोळा शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचत असल्याचे सकारात्मक चित्र आज पाहायला मिळाले. पारोळा नगर परिषदेमार्फत आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १० घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले, तर १८ लाभार्थ्यांना नवीन घरकुलांसाठी बांधकाम परवानग्या वितरित करण्यात आल्या.
केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहकार्यातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे हा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत प्रति घरकुल केंद्र शासनाकडून १ लाख ५० हजार रुपये आणि राज्य शासनाकडून १ लाख रुपये असे एकूण २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे गरजू कुटुंबांना सुरक्षित आणि सन्मानाने राहण्यासाठी घर मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

घरकुल चावी वाटप व बांधकाम परवानगी वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष चंद्रकांत भिकनराव पाटील हे होते. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. रोहन वसंतराव मोरे, मुख्याधिकारी डॉ. तुषार नेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेनेचे गटनेते चौधरी अमृत नाना, उपगटनेते पंकज मराठे, नगरसेवक नितीन दत्तात्रय सोनार, भाजप गटनेत्या अलकाबाई धीरज महाजन, उपगटनेत्या मंगलाबाई सुदाम चौधरी, नगरसेवक अमोल गोविंद शिरोळे यांच्यासह नवनिर्वाचित सर्व नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला शहरातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते १८ लाभार्थ्यांना बांधकाम परवानग्यांचे वाटप करण्यात आले, तर १० घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाधिकारी श्रीमती यामिनी लक्ष्मणसा जटे, रचना सहाय्यक साक्षी मराठे, स्थापत्य अभियंता सुमित पाटील, लेखापाल दीपक महाजन, नगराध्यक्षांचे स्वीय सहाय्यक किशोर चौधरी, शहर तांत्रिक कक्ष अधिकारी भूषण महाजन, शहर समन्वयक शुभम दिनेश कंखरे, समुदाय संघटक कैलास पावसे, क्षेत्रीय समन्वयक राहुल प्रजापती, कैलास वानखेडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत इच्छुक लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणीही करण्यात आली. अधिकाधिक गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत महाजन यांनी केले.



