Home Cities एरंडोल एरंडोल मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा शुभारंभ; जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा शुभारंभ; जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

0
1

पारोळा/एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी ‘जलतारा’ अभियानाच्या पायलट प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत एरंडोल तालुक्यातील खडकेसीम, पारोळा तालुक्यातील वाघरे आणि भडगाव तालुक्यातील आंचळगाव येथे जेसीबी व अन्य यंत्रसामग्रीच्या साहाय्याने जलसंवर्धनाच्या कामांना प्रारंभ करण्यात आला.
शनिवार, १० ऑक्टोबर रोजी तीनही तालुक्यांमध्ये विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. यावेळी जलसंवर्धनाच्या विविध पद्धती, पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत पाणी मुरविणे आणि भूजल पातळी वाढविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियोजनासोबतच प्रत्यक्ष कामांनाही सुरुवात झाल्याने अभियानाच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे.

 

जलतारा संशोधक तथा जलसंवर्धन सेनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम वायाळ आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रकल्प समन्वयक दादासाहेब थेटे यांनी कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले. आमदार ॲड. अमोल पाटील यांनीही जलसंवर्धनासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करत शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

तीन तालुक्यांतील १२ गावांचा समावेश

या पायलट प्रकल्पात पारोळा, एरंडोल आणि भडगाव या तीन तालुक्यांतील एकूण १२ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यात मेहू, टेहू, वाघरा-वाघरी आणि धुळपिंप्री; एरंडोल तालुक्यात उमरे, मालखेडा, टोळी खुर्द आणि खडकेसीम; तर भडगाव तालुक्यात आंचळगाव, धोत्रे, तळबंद तांडा आणि वसंतवाडी या गावांची निवड करण्यात आली आहे.

या गावांमध्ये स्थळपाहणी करून नाले, नैसर्गिक जलप्रवाह, जमिनीचा उतार, पाणलोट क्षेत्र आणि भूजल पातळीचा अभ्यास केला जाणार आहे. संभाव्य जलसंवर्धन स्थळांची GPS लोकेशनसह नोंद करून तांत्रिक निकष आणि स्थानिक गरजांनुसार कामांचे नियोजन करण्यात येणार आहे.

भूजल पुनर्भरणावर भर

पावसाचे पाणी अडविणे, ते जमिनीत जिरविणे, नैसर्गिक जलप्रवाहांचे संवर्धन करणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे, ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांचा सहभाग यांच्या माध्यमातून गावनिहाय जलसंवर्धनाची कामे राबविण्यात येणार आहेत.

या पायलट प्रकल्पातील कामांमुळे भूजल पातळी, जलस्रोतांमधील पाण्याची उपलब्धता आणि शेतीला होणारा लाभ यामध्ये कितपत बदल होतो, याचा भविष्यात अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमातून मिळणारे अनुभव अन्य दुष्काळग्रस्त भागांतील जलसंवर्धनासाठीही उपयोगी ठरू शकतात.

खडकेसीम, वाघरे आणि आंचळगाव येथे सुरू झालेली कामे ही अभियानाच्या अंमलबजावणीतील सुरुवातीची पायरी आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून जलसुरक्षा आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला चालना देण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे.


Protected Content

Play sound