Home क्राईम लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी ‘घात’ ! सासरच्यांना विष देऊन पलायनाचा नववधूचा प्रयत्न फसला

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी ‘घात’ ! सासरच्यांना विष देऊन पलायनाचा नववधूचा प्रयत्न फसला

0
39

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथे विवाहानंतर अवघ्या तीन दिवसांतच घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नववधूने आपल्या साथीदाराच्या मदतीने सासरच्या कुटुंबीयांना जेवणातून गुंगी अथवा विषारी पदार्थ दिल्याचा आणि त्यानंतर घरातून पसार होण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून पारोळा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेल्हाणे येथील वाल्मीक ताराचंद पाटील यांचा विवाह ७ ऑक्टोबर रोजी परराज्यातील सुमन सुभाष सहानी हिच्यासोबत झाला होता. हा विवाह मध्यस्थामार्फत जुळविण्यात आला असून त्यासाठी सुमारे अडीच लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे.

विवाहानंतर काही दिवसांतच घरातील सदस्यांना जेवणातून संशयास्पद पदार्थ देण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला. त्यानंतर काही सदस्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, नववधू सुमन आणि तिच्यासोबत असलेल्या आरती सूर्यप्रकाश पटेल या दोघी घरातून निघून गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या संपूर्ण प्रकारामागे नेमका हेतू काय होता, घरातील रोकड अथवा दागिने घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला होता का, विवाह जुळवून देणाऱ्या मध्यस्थाची नेमकी भूमिका काय आहे आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणात संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपांची सत्यता, कुटुंबीयांना नेमका कोणता पदार्थ देण्यात आला होता आणि या घटनेचे संपूर्ण स्वरूप पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, विवाहासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याचा दावा आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांत घडलेली ही घटना यामुळे वेल्हाणेसह पारोळा तालुक्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.


Protected Content

Play sound