पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, नाले तसेच शासकीय आणि नगरपरिषदेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमणांविरोधात नगरपरिषद प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने शहरातील विविध भागांत कारवाई करून वाहतुकीला आणि नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्यास अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे, शेड, ओटे, हातगाड्या, फलक तसेच इतर साहित्य हटविले.
शहरातील सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत नियोजित स्टेडियम परिसर, बसस्थानक परिसर, कजगाव नाका, स्वर्गीय मीनाताई ठाकरे व्यापारी संकुल, पीर दरवाजा, राजीव गांधी नगर, इंदिरानगर तसेच पाण्याच्या टाकी परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. कारवाईपूर्वी नगरपरिषद प्रशासनाच्या विशेष पथकाने संबंधित भागांची पाहणी करून अतिक्रमणांची नोंद केली. त्यानंतर नियमानुसार संबंधित अतिक्रमणधारकांना सूचना व नोटिसा बजावण्यात आल्या. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. रस्त्यालगत अनधिकृतपणे ठेवण्यात आलेले साहित्य, हातगाड्या, फलक, शेड आणि ओटे हटवून सार्वजनिक मार्ग मोकळे करण्यात आले. मुख्य रस्ते, बाजारपेठ परिसर, सार्वजनिक मार्ग, फुटपाथ तसेच नगरपरिषदेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमणे हटविण्यावर प्रशासनाने विशेष भर दिला. रस्त्यावर साहित्य ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांना यापुढे अशा प्रकारचे अतिक्रमण करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १७९ (१), (३), १८० व १८१ मधील तरतुदीनुसार अतिक्रमणांची पाहणी, नोंदणी आणि आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येत असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त सार्वजनिक जागा उपलब्ध करून देणे, वाहतुकीची कोंडी कमी करणे, पादचाऱ्यांसाठी फुटपाथ व सार्वजनिक मार्ग मोकळे करणे तसेच नगरपरिषदेच्या सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाने सांगितले. अतिक्रमणे हटविल्यामुळे प्रमुख मार्गांवरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास आणि पादचाऱ्यांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यास मदत होणार आहे. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले की, शहरातील सार्वजनिक रस्ते आणि जागा या सर्व नागरिकांच्या सोयीसाठी आहेत. नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे तसेच शहराची शिस्त आणि सौंदर्य कायम राखण्यासाठी अतिक्रमणविरोधी कारवाई सातत्याने सुरू ठेवण्यात येईल. नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या अतिक्रमण हटाव मोहिमेत स्थापत्य अभियंता सुमित पाटील, रचना सहाय्यक साक्षी मराठे, आस्थापना प्रमुख अनिल तिदमे, लेखापरीक्षक दीपक महाजन, अंतर्गत लेखापरीक्षक सार्थक मोरस्कर, पाणीपुरवठा अभियंता संकेत कारले, कर निरीक्षक तथा प्रशासन अधिकारी संजय गीते, संकीर्ण विभागाचे महेश जोशी, स्वच्छता निरीक्षक दिलीप चौधरी, सभा लिपिक किशोर गणपत चौधरी यांच्यासह संदीप बळीराम पाटील, परेश उत्तम चौते, गणेश माळी, राहुल प्रजापती, आकाश सौदागर, निर्भय मोरे, विश्वास पाटील तसेच आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. नगरपरिषदेच्या या कारवाईमुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक जागा मोकळ्या होण्यास मदत झाली असून, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याचा फायदा होणार आहे. अतिक्रमणमुक्त आणि शिस्तबद्ध पारोळा शहरासाठी ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



