जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराचे तापमान सध्या गगनाला भिडत असताना, नागरिकांना या भीषण उष्णतेपासून वाचवण्यासाठी एक अत्यंत दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. “महाराष्ट्रातील उष्णता व पाणी ताण कमी करण्यासाठी निसर्ग आधारित उपाय” या विशेष प्रकल्पांतर्गत समता नगर (प्रभाग क्र. १२) येथे ‘कूल रूफ सोल्युशन’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शानदार शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे घरातील तापमानात थेट १० अंश सेल्सिअसने घट होणार असल्याने जळगावकरांना मोठा आधार मिळाला आहे.
हा प्रकल्प ‘ऑल इंडिया डिझास्टर मेटिगेशन इन्स्टिट्यूट’ (AIDMI), अहमदाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रॅक्टिकल ॲक्शन’ आणि ‘कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था’ (KVGPS) यांच्या सहकार्याने तसेच जळगाव महानगरपालिकेच्या सक्रिय सहभागातून राबविण्यात येत आहे.

विज्ञानाची साथ आणि तापमानात घट :
या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पत्र्याच्या घरांवर दिला जाणारा ‘सोलर रिफ्लेक्टिव्ह’ रंगाचा डबल कोट. हा विशेष रंग सूर्याच्या उष्ण किरणांना परावर्तित करतो, ज्यामुळे घराचे छत तापत नाही. पहिल्या टप्प्यात शहरातील १०० घरांची निवड करण्यात आली असून, उद्घाटन प्रसंगी प्रत्यक्ष तापमान मोजले असता रंग दिलेल्या घरांमध्ये १० अंशांचा फरक दिसून आला.
मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुक :
कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, आणि उपआयुक्त पंकज गोसावी यांनी स्वतः घरांच्या तापमानाची पाहणी करून या तंत्रज्ञानाचे कौतुक केले. लाभार्थ्यांनीही आपले अनुभव सांगताना स्पष्ट केले की, या उपक्रमामुळे घरातील राहणीमान आता अधिक सुसह्य झाले आहे.
प्रकल्पाचा विस्तार आणि भविष्यातील नियोजन :
केवळ १०० घरांपुरता हा उपक्रम मर्यादित नसून, आगामी काळात एकूण ४०० घरांपर्यंत याचा विस्तार केला जाणार आहे. विशेष म्हणजे, छोटे व्यावसायिक व ७० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या २०० दुकानांनाही याचा लाभ देण्यात येईल. जळगाव मनपाच्या पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील यांच्या नियोजनाखाली पुढील ३ वर्षे उष्णता आणि पाणीटंचाई कमी करण्यासाठी हा निसर्ग आधारित लढा सुरू राहणार आहे. अमोल काळे, धीरज अंबिकार आणि शुभम शिरतुरे यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.



