पाचोरा प्रतिनिधी । येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ४ बैलांना पकडून पाचोरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेला पुन्हा एकदा यश आले असून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे परिसरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोहारा गावाच्या पाचोरा रोडवर बाहेर रस्त्याच्या कडेला एक महिंद्रा कंपनीची पिकप मालवाहू गाडी (क्रं, एम. एच. ०४ – ई. बी. २९६९) ही गाडी उभी होती. बजरंग दल कार्यकर्त्यांनी गाडीच्या ड्राईव्हर अलीम शहा सलीम रा.बाहेरपुरा (पाचोरा) याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिल्यानंतर शंका आल्यावर बजरंग दलाचे महेंद्र घोंगडे यांनी लोहारा येथील हेमंत गुरव यांना फोन वरून सगळ्या घटनेची माहिती दिली असता त्यांनी गाडी लोहारा आऊट पोस्ट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याचे सांगितले. नंतर तात्काळ हेमंत गणेश गुरव यांनी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून सदर विषयाची सविस्तर माहिती दिली.
दरम्यान, यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बघितले असता त्यांना गाडीच्या मागील भागात दाटीदाटीने अडचणीचे जागी मान तोंड दोरीने बांधून प्राण्यांचा छळ होईल व अमानुषपणे गुरांची वाहतूक होताना दिसून आल्याचे अशा प्रकारे वाहतूक करण्याचा परवाना नसतांना अवैधरित्या निदर्यतेने कोंबून वाहतूक करीत होते. यानंतर वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचने नुसार सदरील गुरांची गाडी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आल्यानंतर गाडीचा तसेच गुरांचा सविस्तर पंचनामा करून सदरील ४ गुरे (बैल) हे पिंपळगाव (हरेश्र्वर) येथील राजराजेश्वरी गौ, शाळा येथे रवाना करण्यात आले आहे.
तसेच पोलीस स्टेशनचे कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण देशमुख यांच्या फिर्यादीवरून सदरील आरोपी अलीम शहा सलीम रा. बाहेरपुरा, (पाचोरा) याचे विरुध्द दि. २७ डिसेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्यातील मुद्देमाल ३ लाख ४२ हजार रुपये सदरील गाडी ही पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली असून लोहारा येथील बजरंग दल कार्यकर्ते हेमंत गणेश गुरव, रामराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कोळी, लोहारा बजरंग दल शाखा संयोजक महेंद्र घोंगडे, संघाचे गुणवंत क्षीरसागर हे साक्षीदार असून पुढील गुन्ह्याचा तपास पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा बिट पोलीस हवालदार अरविंद मोरे हे करीत आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेला पुन्हा एकदा यश आले असून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे परिसरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.