मोठी बातमी : मुदत संपलेल्या नगरपालिकांवर प्रशासकांची नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी | ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे मुदत संपलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांवर राज्य शासनाने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. याबाबतचा जीआर जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती आणि नगरपरिषदांची मुदत या महिन्याच्या अखेरीस संपत आहे. यातील नगरपंचायतींची निवडणूक २१ डिसेंबर रोजी घेण्यात आली आहे. यातच ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न देखील कायम असल्याने तेथेही अनारक्षीत जागांचीच निवडणूक झालेली आहे. कालच राज्य विधानसभेने ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न सुटत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा प्रस्ताव संमत केला आहे. यामुळे नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भातील वृत्त आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवर वाचलेले असेलच.

या पार्श्‍वभूमिवर, राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने शासन निर्णय अर्थात जीआर काढून या महिन्याच्या अखेरीस मुदत संपलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांवर प्रशासक लावण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. या जीआरमध्ये नाशिक विभागातील नगरपालिकांचाही समावेश आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १२ नगरपालिकांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील १२ नगरपालिका आणि त्यांच्यावर लावण्यात आलेले प्रशासक खालीलप्रमाणे आहेत.

नगरपालिका प्रशासक अधिकारी

१) भुसावळ – उपविभागीय अधिकारी

२) अमळनेर – उपविभागीय अधिकारी

३) चाळीसगाव – मुख्याधिकारी

४) चोपडा – उपविभागीय अधिकारी

५) पाचोरा – उपविभागीय अधिकारी

६) पारोळा – मुख्याधिकारी

७) धरणगाव – मुख्याधिकारी

८) एरंडोल – मुख्याधिकारी

९) फैजपूर – मुख्याधिकारी

१०) रावेर – उपविभागीय अधिकारी

११) सावदा – उपविभागीय अधिकारी

१२) यावल – उपविभागीय अधिकारी

जळगाव जिल्ह्यातील वर नमूद केलेल्या सर्व नगरपालिकांची मुदत ही २९ डिसेंबर रोजी संपत आहे. परिणामी ३० डिसेंबर पासून संबंधीत नगरपालिकांमधील नगराध्यक्ष आणि अन्य नगरसेवकांचे वर्चस्व समाप्त होणार असून आता सर्व ठिकाणी प्रशासक राज सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!