धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेअर मार्केटमधील कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आपल्याच आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना धरणगाव शहरात गुरूवारी २६ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली होती. या हल्ला वृध्द महिला ही गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगावातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तेजस विलास पोतदार (रा. धरणगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, लीलाबाई रघुनाथ विसपुते वय-७० रा. महाबळ, जळगाव या वृध्द महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होत्या. धरणगाव त्याची मुलगी वैशाली विलास पोतदार यांच्याकडे २५ जून रोजी मुक्कामीसाठी गेल्या होत्या. दरम्यान, वैशाली पोतदार यांचा मुलगा आरोपी तेजस पोतदार हा वैशाली पोतदार यांचा लहान मुलगा असून, तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. या गुंतवणुकीमुळे त्याने मोठ्या प्रमाणावर कर्ज केले होते. तेजस एक वर्षापूर्वी जळगाव येथे मामाच्या घरीसहा महिने राहिला होता. त्यावेळी देखील काही लोक त्याच्याकडे पैशांच्या मागणीसाठी येत असत. यामुळे आजी लीलाबाई तेजसला नेहमी व्याजाने पैसे घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याबद्दल बोलत असत. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत होता.
गुरूवारी २६ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास तेजस आणि लिलाबाई यांच्यात शेअर मार्केटच्या कर्जावरून पुन्हा मोठा वाद झाला होता. त्यानंतर लीलाबाई बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेल्या. त्यावेळी तेजस हा कुऱ्हाड घेवून आल्याचे त्यांचा भाऊ अक्षयने पाहिले होते. त्यावेळी मी पिंपळाचे झाड तोडण्यासाठी जात असल्याचे सांगून तो खाली निघून गेला. आणि त्यानंतर अक्षय हा अभ्यास करण्यासाठी त्याच्या खोलीत निघून गेला. त्यावेळी तेजसने आजी झोपेत असतांना तिच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून जखमी केले. बाजूलाच कुऱ्हाड ठेवली आणि भाऊ याच्याकडे पळत आला आणि आजीवर कुणीतरी कुऱ्हाडीने हल्ला केला असा बनाव केला. रक्ताच्या थारोळ्या गंभीर अवस्थेत पडलेल्या वृध्द लिलाबाई यांना तातडीने रूग्णवाहिकेतून जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सकाळी झालेल्या वादातून रागाच्या भरात तेजसनेच आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याचे अक्षय पोतदार यांने सांगितले.
याप्रकरणी जखमी लिलाबाई यांच्या मुलाचा मुलगा उमेध धीरेंद्र विसपुते रा. महाबळ याने धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी तेजस विलास पोतदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव पोलीसांनी संशयित आरोपी तेजस पोतदार याला अटक केली असून पुढील कारवाईला सुरूवात करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.