पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे आज मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात विविध शासकीय विभागांनी एकत्र येत नागरिकांना एकाच छताखाली अनेक सेवा, दाखले आणि योजनांचा लाभ मिळवून दिला. नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाधान व्यक्त केले.
या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सहजतेने उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण करणे हे होते. शिबिरात महसूल विभागाने ४७ वारस उतारे आणि अनेक उत्पन्न दाखले वितरीत केले. गट संधारण केंद्राने ११८ दिव्यांगांना वार्षिक भत्ता वाटप केला, तर पंचायत समितीच्या घरकुल योजनेचे ९ अर्ज निकाली काढण्यात आले.
पुरवठा विभागाने १५७ रेशन कार्ड संबंधित अर्ज पूर्ण केले, तर पशुवैद्यकीय विभागाने ३२ लाभार्थ्यांना मका व ज्वारी बियाणे वाटप केले. संजय गांधी निराधार योजनेच्या २६ अर्जांवर कार्यवाही झाली, तर महावितरणने १८ लाभार्थ्यांना नवीन कनेक्शन व सौर ऊर्जा योजनांचा लाभ दिला. पाटबंधारे विभागाने ७ प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर वन विभागाने हिंस्र प्राण्यांपासून शेती संरक्षणाचे उपाय सांगितले. आरोग्य विभागाने २७ आरोग्य तपासण्या केल्या. कृषी विभागाने पीएम किसान योजनेत ५० नवीन नोंदण्या केल्या, २५ जणांना फळबाग योजनेचा लाभ दिला. ७ ट्रॅक्टर, ११ रोटर आणि ३२ ठिबक सिंचन अर्ज मंजूर झाले.
या शिबिरात एकूण ९२१ अर्ज प्राप्त झाले होते आणि विशेष म्हणजे, सर्वच्या सर्व अर्जांची तात्काळ तपासणी करून जागेवरच निकाली काढण्यात आले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत असे शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत, नायब तहसीलदार प्रतिभा राजपूत, पुरवठा विभागातील सुषमा उरकुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, विनोद तावडे, नांद्रा मंडळ अधिकारी वैशाली पाटील, ग्राम वसूली अधिकारी दीपक दवंगे, तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशस्वी आयोजनामुळे प्रशासनाने जनतेच्या विश्वासाला खऱ्या अर्थाने प्रतिसाद दिला आहे.