ए.टी. झांबरे विद्यालयात ‘कालिदास दिवस’ उत्साहात साजरा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय संस्कृती आणि साहित्याचे महान रत्न महाकवी कालिदास यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जळगाव येथील ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘कालिदास दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या महान कवीला आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणीता झांबरे यांनी अध्यक्षस्थान भूषवले. पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे आणि ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पूनम कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कालिदास यांच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम्’, ‘मेघदूत’, ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’ यांसारख्या अजरामर काव्यांची माहिती देऊन संस्कृत साहित्यातील त्यांच्या योगदानाची महती पटवून दिली. विद्यार्थ्यांनी कालिदास यांच्या काव्यांवर आधारित नाट्यछटा, भाषणे, कविता सादरीकरण, तसेच श्लोक वाचन यांसारखे विविध मनोवेधक कार्यक्रम सादर केले. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे आयोजन आणि समन्वय मुख्याध्यापिका प्रणीता झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्कृत विषयाचे शिक्षक श्री. वेदप्रकाश गडदे आणि महेंद्र मिरकुटे यांनी केले. कार्यक्रमासाठीचे सुंदर फलक लेखन ृनिर्मल चतुर यांनी केले होते. वर्ग १० वी मधील विद्यार्थी गिरीश सोनवणे, करण पाटील, कार्तिक पवार, ओम महाजन, भाग्यश्री पाटील, कु. चातुर्या सोनवणे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संचालन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी, विद्यार्थ्यांना कालिदास यांच्या साहित्याचे महत्त्व, त्यातील नैतिकता आणि निसर्गप्रेम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी अभिमान निर्माण करणारा ठरला असून, उपस्थित पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी याचे भरभरून कौतुक केले.