तलवारीच्या धाक दाखवत दहशत माजविणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार ‘डॉन’ला अटक

फैजपूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पाडळसा गावात असलेल्या कोसगाव रस्त्यावरील चौकात हातात बेकायदेशीररित्या तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे (वय-२८, रा. पाडळसा ता. यावल) याला फैजपूर पोलिसांनी लोखंडी तलवारीसह अटक केल्याची कारवाई रविवार ३ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता केली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील पाडळसा गावातील कोसगाव रस्त्यावर सराईत गुन्हेगार प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे हातात तलवार घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने रविवारी ३ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता तातडीने कारवाई करत सराईत गुन्हेगार प्रवीण उर्फ डॉन याला यावल तालुक्यातील पाडळसा गावातून अटक केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक विनोद गव्हाणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास सोनवणे, मोती पवार, बाळू भोई, राहुल महाजन, सहायक फौजदार अरुण नामयते यांनी केली. दरम्यान प्रवीण उर्फ डॉन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चोरी, अवैध दारू विक्री, धमक्या असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.

Protected Content